पाचोऱ्यात भटक्या कुत्र्यांचा थरार! दामजी नगरात ‘ॲम्बुलन्स बाबाजी’ थोडक्यात बचावले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पाचोरा (राहुल महाजन,मधुर खान्देश):
पाचोरा शहर आणि परिसरात सध्या भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरुवारी पहाटे दामजी नगर परिसरात शिवसेनेचे कार्यकर्ते बाबाजी ठाकरे (ॲम्बुलन्स बाबाजी) यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला चढवला, मात्र सुदैवाने ते यातून थोडक्यात बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दामजी नगर परिसरातील रहिवासी असलेले बाबाजी ठाकरे हे दररोजप्रमाणे गुरुवारी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. यावेळी अचानकपणे तीन ते चार भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बाबाजी ठाकरे यांनी दाखवलेली प्रसंगावधानता आणि सतर्कतेमुळे ते या जीवघेण्या हल्ल्यातून सुखरूप बचावले.
कृष्णापुरी विठ्ठल मंदिराजवळील वृद्ध महिलेवरही हल्ला
भटक्या कुत्र्यांचा हा उपद्रव केवळ दामजी नगरापुरता मर्यादित नसून, कृष्णापुरी भागातील विठ्ठल मंदिर परिसरातही एका वृद्ध महिलेवर कुत्र्यांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या वाढत्या घटनांमुळे लहान मुले, वृद्ध आणि पहाटे कामावर जाणाऱ्या कामगारांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
नगरपालिका प्रशासनाकडे आर्त हाक!
शहरातील विविध गल्लीबोळांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली असून, ते रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांच्या मागे धावणे किंवा पादचाऱ्यांवर चाल करून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. या गंभीर समस्येकडे नगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
“सकाळी चालणे देखील आता कठीण झाले आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीने मोहीम राबवावी, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.”
— बाबाजी ठाकरे, पाचोराआता पाचोरा नगरपालिका यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





