पाचोरा कनिष्ठ महाविद्यालयात पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन! पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांची प्रमुख उपस्थिती.

पाचोरा, दि. ०८ ऑगस्ट २०२५: एम. एम. कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित जनजागृतीपर व्याख्यानमालेच्या अंतर्गत पाचोरा पोलीस स्टेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे आणि पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि महिलांशी संबंधित कायद्यांविषयी माहिती दिली.
पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे यांनी संत साहित्याचे दाखले देत विद्यार्थ्यांना आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवण्याचे कळकळीचे आवाहन केले. तर पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी विद्यार्थ्यांना सोशल नेटवर्किंग साइट्सपासून दूर राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून यश मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. एस. एस. पाटील होते. प्रास्ताविक पर्यवेक्षक डॉ. जे. पी. बडगुजर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी आणि आभार प्रदर्शन डॉ. सुनिता गुंजाळ यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






