पाचोरा तालुक्यात खरीप हंगाम 2025 साठी ई-पीक पाहणीला प्रारंभ

पाचोरा, दि. ०८ ऑगस्ट २०२५: महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या शासन निर्णयानुसार (क्र. संकीर्ण-2024/प्र.क्र.157/10-अ, दि. 14/10/2024) केंद्र शासनाच्या डिजीटल क्रॉप सर्वे प्रकल्पांतर्गत खरीप हंगाम 2025 साठी पाचोरा तालुक्यातील 129 गावांमध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून मोबाईल अॅपद्वारे ई-पीक पाहणी सुरू झाली आहे. सर्व शेतकऱ्यांनी 14 सप्टेंबर 2025 पर्यंत पेरणी केलेल्या क्षेत्राची 100% ई-पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार विजय बनसोडे यांनी केले आहे.
पाचोरा तालुक्यातील मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि सहाय्यकांना 23 जुलै 2025 रोजी ई-पीक पाहणीबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. ही पाहणी पूर्ण केल्यास शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई, पीक कर्ज, अॅग्रीस्टॅक अंतर्गत सरकारी योजना आणि किमान आधारभूत किंमत (MSF) योजनेचा लाभ घेता येईल.
शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीत कोणत्याही अडचणी आल्यास संबंधित गावातील ग्राम महसूल अधिकारी किंवा नियुक्त सहाय्यकांची मदत घ्यावी, असे तहसीलदार विजय बनसोडे यांनी सांगितले. सर्व शेतकऱ्यांनी वेळेत पाहणी पूर्ण करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.






