पाचोऱ्यात गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलचा बॅडमिंटनमध्ये दबदबा; विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

पाचोरा, 7 ऑगस्ट 2025: पाचोरा येथे आयोजित तालुकास्तरीय 14 वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेत गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाने सर्वांचे लक्ष वेधले. या स्पर्धेत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले आहे.
पाचोरा तालुक्यातील विविध शाळांमधील इंग्रजी, सेमी-इंग्रजी आणि जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या सत्यजित जैन, तेजस सपकाळ, पृथ्वीराज परदेशी, केतन महाले, कौस्तुभ चौधरी, तसेच शताक्षी माळी, तृप्ती महाजन, साक्षी पवार, रीषिका पाटील आणि वेदिका पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले.
शाळेचे प्राचार्य प्रेम शामनानी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत म्हटले, “विद्यार्थ्यांनी मेहनत आणि समर्पणाने मिळवलेले हे यश आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतही ते उत्कृष्ट प्रदर्शन करतील, असा विश्वास आहे.” क्रीडा शिक्षिका साक्षी पवार आणि क्रीडा शिक्षक निरंजन राठोड यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी ही कामगिरी साध्य केली आहे.
याशिवाय, तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेतही गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून, सलग दुसऱ्या दिवशी बॅडमिंटनमध्ये मुला-मुलींच्या संघांनी घवघवीत यश संपादन केले. या यशाबद्दल शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थी आणि प्रशिक्षकांचे कौतुक केले आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतही विद्यार्थी आपली छाप पाडतील, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला आहे.