पाचोऱ्यात ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ अंतर्गत तक्रार निवारण सभेचे आयोजन
पाचोरा, दि. ३१ ऑगस्ट २०२५: पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या जनकेंद्रीत उपक्रमांतर्गत तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांच्या संकल्पनेतून आणि मा. आमदार किशोरआप्पा पाटील (पाचोरा-भडगाव विधानसभा) यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच मा. मिनल करनवाल (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा दिनांक ०३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता तात्यासाहेब आर.ओ. पाटील व्यापारी संकुल, कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर, पाचोरा येथे होणार आहे.
या सभेला जिल्हास्तरीय सर्व विभागप्रमुख उपस्थित राहणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारींची नोंद सभा सुरू होण्यापूर्वी करण्यात येईल. तक्रारदारांना टोकन देण्यात येईल आणि टोकन क्रमांकानुसार त्यांच्या समस्या ऐकून तातडीने उपाययोजना केल्या जातील. यासाठी पंचायत समिती, पाचोरा यांच्यामार्फत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी श्री. के.बी. अंजने यांनी दिली.
‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत होणाऱ्या या तक्रार निवारण सभेला ग्रामीण भागातील नागरिक, आजी-माजी पदाधिकारी, सरपंच आणि पत्रकार बंधूंनी उपस्थित राहावे, असे आवाहन पंचायत समिती, पाचोरा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.