पाचोरा तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार, जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांनी केली पाहणी

पाचोरा: तालुक्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि पुरामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी आज जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांनी केली. त्यांनी वेरुळी खुर्द, वाडी-शेवाळे, शिंदाड, सातगाव डोंगरी यांसारख्या अतिवृष्टीग्रस्त गावांना भेटी देत स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.या पाहणी दौऱ्यात डोंगरे यांनी पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक भागांतील दलित वस्तींमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अन्न, धान्य, आणि गुरे-ढोरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे अनेक घरांची पडझड झाली असून, पशुधन आणि संसारोपयोगी साहित्याचीही हानी झाली आहे. तसेच, ग्रामीण भागातील रस्ते आणि पुलांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी पूरग्रस्त समाजबांधव आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रशासनाशी चर्चा करून उपाययोजना करण्याचे आश्वासन डोंगरे यांनी दिले. तसेच, नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.या पाहणी दौऱ्यात त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष पिटू सावळे, तालुका सचिव दशरथ तांबे, समता सैनिक दलाचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.