पाचोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार; शेती आणि घरांचे मोठे नुकसान, शेकडो जनावरे दगावली! प्रांत अधिकारी भूषण अहिरे

पाचोरा, 18 सप्टेंबर: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पुराने पाचोरा तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार तयार केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, या नैसर्गिक आपत्तीत कोणतीही मनुष्यहानी झाली नसली तरी, मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे.
शेकडो पाळीव जनावरांचा मृत्यू!
या अतिवृष्टीने सर्वाधिक फटका जनावरांना बसला आहे. तालुक्यातील शिंदाड, सातगाव डोंगरी, निंभोरी, वानेगाव, वडगाव कडे, वेरूली, राजुरी, पिंप्री, गहुले वाडी शेवाळे, खडकदेवळा या गावांमध्ये एकूण 1,879 जनावरे दगावली आहेत. यामध्ये 90 मोठी दुधाळ जनावरे, 128 लहान दुधाळ जनावरे, 23 मोठी ओढकाम करणारी जनावरे आणि 41 लहान ओढकाम करणारी जनावरे यांचा समावेश आहे. याशिवाय 1,572 कोंबड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत, तर 25 पाळीव डुकरांचाही मृत्यू झाला आहे. अनेक जनावरे अजूनही बेपत्ता असून, त्यांची मृतदेह सापडलेले नाहीत.
घरांचे आणि कुटुंबांचे नुकसान
पुरामुळे 361 कुटुंबांना दोन दिवसांपेक्षा अधिक काळ बाधीत राहावे लागले आहे. या अतिवृष्टीने अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. एकूण 56 कच्ची घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत, तर 248 कच्ची घरे आणि 25 पक्की घरे अंशतः क्षतिग्रस्त झाली आहेत. यासोबतच 32 झोपड्या आणि 54 गोठ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
सध्या नुकसानीचा पंचनामा सुरू असून, अंतिम अहवाल आल्यानंतर आकडेवारीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत.