क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले स्मारकासमोर अनधिकृत वाहनांवर कारवाई करण्याची मागणी

पाचोरा: येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मारकासमोर अनधिकृतपणे उभी केली जाणारी वाहने, हातगाड्या आणि फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी पाचोरा पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे.
या निवेदनात नागरिकांनी म्हटले आहे की, अनेक वाहनधारक आपली चारचाकी वाहने स्मारकासमोर अनधिकृतपणे उभी करतात. त्यामुळे स्मारक झाकले जाते आणि त्याचे विद्रुपीकरण होते. तसेच, या ठिकाणी अनधिकृत हातगाड्या आणि फेरीवालेदेखील उभे राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या गंभीर बाबीकडे लक्ष वेधून स्मारकाचे पावित्र्य राखण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
यावेळी निवेदन देण्यासाठी संतोष महाजन, सुदर्शन महाजन, कन्हैया देवरे, मयूर महाजन आणि नाना महाजन यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.