पाचोरा तालुक्यातील पूरग्रस्तांना दिलासा: सातगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर’ संपन्न

पाचोरा: येथील मौजे सातगाव येथे नुकतेच ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर’ आयोजित करण्यात आले होते. महसूल पंधरवड्यानिमित्त पुरवठा शाखा, पाचोरा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा मुख्य उद्देश पूरग्रस्त कुटुंबांना आणि धान्याचा लाभ मिळत नसलेल्या पात्र कुटुंबांना मदत करणे हा होता.
या शिबिरामध्ये पूरग्रस्त भागातील २० कुटुंबांच्या शिधापत्रिका पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या. अशा कुटुंबांना त्यांच्या आधार कार्डच्या आधारे त्यांच्या शिधापत्रिका क्रमांक शोधून तो उपलब्ध करून देण्यात आला. यासोबतच, ज्या ८० पात्र कुटुंबांना अद्याप धान्याचा लाभ मिळत नव्हता, त्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले.
या शिबिरास पाचोरा तालुक्याचे तहसीलदार श्री. विजय बनसोडे, पुरवठा निरीक्षक श्री. राहुल पवार, लिपिक श्री. सोमनाथ मिस्तरी, तलाठी श्री. उमेश पाटील आणि श्री. शुभम सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याव्यतिरिक्त, स्वस्त धान्य दुकानदार श्री. शंकर पवार, श्री. विकास पाटील आणि श्री. अमोल दाभाडे यांनीही सहभाग घेतला.
या शिबिरामुळे अनेक गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, शासनाच्या ‘समाधान शिबीर’ योजनेचा योग्य लाभ गरजूपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला.





