रेल्वेमध्ये नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक; मुख्य आरोपीसह एक साथीदार गजाआड!

ठाणे, प्रतिनिधी:रेल्वेत टीसीची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या योगेश हरी साळोखे (वय ३४, रा. हसूर खुर्द, ता. कागल, जि. कोल्हापूर) याला अखेर अटक करण्यात आली आहे. गडहिंग्लज येथून अटक झाल्यानंतर त्याला कल्याण पोलीस ठाण्यात आणले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. या टोळीने अंदाजे २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. बंगला, गाड्या आणि जमीनही फसवणुकीतून?
आरोपी योगेश साळोखे याने फसवणुकीच्या पैशातून गडहिंग्लज येथे स्वतःच्या आणि पत्नीच्या नावावर बंगला, चारचाकी आणि दुचाकी वाहने खरेदी केली आहेत. तसेच, त्याने गावात शेतजमीनही घेतल्याची माहिती मिळाली आहे. ही सर्व संपत्ती फसवणुकीतून जमा केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अटकपूर्व जामीन फेटाळला या गुन्ह्यात अडकलेल्या आरोपीने जिल्हा न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, दोन्ही न्यायालयांनी त्याचा अर्ज फेटाळला. त्यानंतरही तो पोलिसांपुढे शरण आला नाही, त्यामुळे गडहिंग्लज येथील त्याच्या राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली. सध्या त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली असून, पोलिसांनी १.८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरित रक्कम कुठे गुंतवली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.सहआरोपीही अटकेत या गुन्ह्यात योगेश साळोखेचा साथीदार रोहित मारुती मुळीक (वय २९) यालाही कोल्हापूर येथून अटक करण्यात आली आहे. हे दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून, त्यांनी अनेक गरीब शेतकरी कुटुंबातील तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवले आहे. पूर्वीही गंभीर गुन्हे दाखल
आरोपी योगेश साळोखे याच्यावर यापूर्वीही कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मुलींची छेड काढण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलीस या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहत आहेत. पुढील तपास कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांचे आव्हान आणि नागरिकांना इशारा
सध्या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशा फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सतर्क राहण्याचा इशारा पोलीस खात्याने नागरिकांना दिला आहे. कल्याण पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे बेरोजगार तरुणांना दिलासा मिळाला असून, स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे. या टोळीच्या अटकेमुळे अशा फसवणुकीला आळा बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.






