आमदार किशोर पाटलांच्या विरोधात विरोधक एकत्र! पाचोऱ्यात राजकीय चर्चांना उधाण, मंत्री महाजन व चव्हाण यांचा संपर्क वाढला

पाचोरा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यात जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. एकीकडे आमदार किशोर पाटील यांची तालुक्यात एकतर्फी सत्ता आणि विकासाच्या मुद्द्यावर असलेला जनसंपर्क त्यांच्या विजयाचा रथ वेगाने पुढे नेत असताना, दुसरीकडे पाटील यांचा विजयरथ रोखण्यासाठी प्रतिस्पर्धी विरोधक मात्र एकत्र येत असल्याचे चित्र आहे. मागील राजकारणाचा अनुभव लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचे जुने प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार दिलीप वाघ, तसेच वैशाली सूर्यवंशी आणि अमोल शिंदे यांना एकत्र आणले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका) आपली छाप पाडण्यासाठी भाजपने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असल्याची चर्चा सर्वत्र आहे. या राजकीय युतीमुळे पाचोरा तालुक्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
- अंतर्गत धुसफूस आणि जुन्या शिवसैनिकांची चिंता,चहा पेक्षा किटली गरम
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या एका गटात मात्र अंतर्गत धुसफूस असल्याची कुजबूज आहे. विशेषतः आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली इतर पक्षातून होणारे प्रवेश यामुळे जुन्या शिवसैनिकांचे महत्त्व कमी होईल किंवा त्यांचे वर्चस्व धोक्यात येईल का? अशा शंका-कुशंका शिवसैनिकांमध्ये निर्माण झाल्या आहेत. तर विकासाच्या मुद्द्यावर व कार्यकर्त्याच्या चांगल्या फळी मुळे आमदार किशोर पाटील यांनी एक हाती घेत स्वतःचे वर्चस्व निर्माण केले आहे परंतु काही स्वार्थी ठेकेदारांच्या माध्यमातून चहा पेक्षा किटली गरम अशी परिस्थिती असल्याचे बोलले जात आहे.
‘८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण’ या मुद्द्यावर निवडून आलेले काही शिवसैनिक उंच भरारी घेत असले तरी अनेक निष्ठावान कार्यकर्ते आजही आहे त्याच ठिकाणी असल्याचे सध्याचे चित्र आहे. या संपूर्ण विषयाकडे शिवसेना नेतृत्वाने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
- गिरीश महाजन-मंगेश चव्हाण यांच्या वाढत्या संपर्कामुळे चर्चांना जोर
मागील काही काळापासून मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांचा पाचोरा तालुक्यात संपर्क वाढला आहे. या वाढलेल्या संपर्कामुळे स्थानिक राजकारणात अनेक नवीन चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांना एकत्र आणण्यात या नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याचे मत वर्तवली जात आहे.
- विकासाच्या मुद्द्यावर जनसमर्थन किशोर पाटील कायम
आमदार किशोर पाटील यांना विकासाच्या मुद्द्यावर जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला आहे, हे निर्विवाद सत्य आहे. विरोधकांची ही नवी मोट आणि शिवसेनेतील अंतर्गत राजकारण यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही फरक पडेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
तरीही, सध्याच्या घडीला अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्याचबरोबर भाजपचा एक गट आजही आमदार किशोर पाटील यांच्यासोबत खंबीरपणे उभे असल्याने त्यांचा विजयरथ रोखणे सध्यातरी शक्य नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पाचोरा तालुक्यात आता येणाऱ्या निवडणुकीपर्यंत जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि डावपेच पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.






