सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा दि पाचोरा लॉयर्स असोसिएशन कडून निषेध, दोषीवर कठोर कारवाईची मागणी; तहसीलदारांना निवेदन सादर.

पाचोरा: दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश नामदार न्यायमूर्ती श्री. भूषणजी गवई यांच्यावर भर कोर्टरूममध्ये बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. या भ्याड कृत्याचा पाचोरा शहरातील वकील बांधवांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ‘दि पाचोरा लॉयर्स असोसिएशन’च्या वतीने तहसीलदार साहेब, पाचोरा यांना निवेदन सादर करून, दोषींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘संविधानावरचा हल्ला’
असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अभय पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले. निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न हा केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून, तो भारतीय संविधानावर केलेला हल्ला आहे. या कृत्याचा आणि यामागील धर्मांध व जातीयवादी विकृतीचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
सर्वोच्च न्यायालयात हे निंदनीय कृत्य करणाऱ्या वकील राकेश किशोर याच्यावर शासनाने स्वतः फिर्यादी होऊन कठोर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, “सदर घटनेच्या माध्यमातून धर्मांध व जातीयवादी विचार या देशाला व देशाच्या संविधानाला संपवण्याची मानसिकता रुजवण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. या कृतीला किरकोळ कृती म्हणून शासनाने दुर्लक्षित करू नये.”
न्यायव्यवस्थेचा धाक समाजात कायम राहण्यासाठी, अशा विकृतींचा कठोर कायदा करून बिमोड करणे अत्यावश्यक आहे, अशी कळकळीची विनंती वकिलांनी शासनाला केली आहे. हे निवेदन दि. पाचोरा लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना देण्यात आले.या निवेदनावर उपाध्यक्ष अॅड.रविंद्र ब्राम्हणे,सचिव अॅड.सुनिल सोनवणे, वाचनालय सचिव अॅड.अंकुश कटारे,अॅड.नरेंद्र डाकोरकर,अॅड.भाग्यश्री महाजन, अॅड.करूणाकर ब्राम्हणे,अॅड.ज्ञानेश्वर लोहार, अॅड. प्रशांत मालखेडे, अॅड. अण्णासाहेब हिम्मतराव, अॅड. मुबारक एस. पठाण, अॅड. के. एम. सोनवणे, अॅड. शांतीलाल अमृत, अॅड. एम. बी. मराठा, अॅड. प्रदीप सूर्यवंशी, अॅड. मंगेश गायकवाड, अॅड. जी. डी. पाटील, अॅड. बी. के. महाजन, अॅड. सागर सावळे, अॅड. अनिल पाटील आदींच्या सह्या करून देण्यात आले आहे. या घटनेमुळे न्यायव्यवस्थेच्या सुरक्षिततेवर आणि देशातील लोकशाही मूल्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पाचोरा लॉयर्स असोसिएशनने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत न्यायव्यवस्थेच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आहे.





