पाचोऱ्यात माजी आमदारांच्या पत्नीचे बॅनर फाडले? ‘बॅनर फाडून राजकारण करणे योग्य नाही’: माजी नगरसेवक भूषण वाघ यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पक्षांमध्ये फोडा – फाडीचे राजकारण ठीक, पण बॅनर फाडून राजकारण अयोग्य – भूषण वाघ
पाचोरा (मधुर खान्देश वृत्तसेवा)- राजकीय पक्षांमध्ये होणारे फोडा-फाडीचे राजकारण एकवेळ ठीक आहे, परंतु एखाद्याचे शुभेच्छांचे बॅनर फाडून राजकारण करणे हे योग्य नाही, असे मत माजी नगरसेवक भूषण दिलीप वाघ यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना बॅनर फाडण्याचे प्रकार टाळण्याचे आवाहन केले आहे.
माजी नगरसेवक भूषण दिलीप वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्री ड्रीम सिटी परिसरात त्यांच्या पत्नी सौ. सुचिताताई दिलीप भाऊ वाघ यांनी दिवाळीनिमित्त लावलेले शुभेच्छांचे आशीर्वाद देणारे बॅनर फाटलेले दिसले. या प्रकाराबद्दल बोलताना वाघ यांनी आपली खंत व्यक्त केली.
ते म्हणाले, “माझे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका असोत, त्या पूर्णपणे व्यवस्थित पार पाडणे ही जशी प्रशासनाची जबाबदारी आहे, तशीच ती आपलीसुद्धा आहे. बॅनर फाडून कुणी निवडून येत नसतं किंवा पडतही नसतं.”
अशा प्रकारांमुळे शहरातील आणि प्रभागातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. म्हणूनच त्यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना विनंती केली आहे की, असले प्रकार होऊ नयेत व होऊ देऊ नयेत यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी आणि शहराच्या शांततेत व सलोख्यात निवडणुका पार पाडण्यासाठी सहकार्य करावे.






