जळगाव व नाशिक जिल्हा पोलिसांची प्रतिमा उंचावण्याचे प्रयत्न स्तुत्य; पण पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर हद्दीतील पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह!

गुटखा,सट्टा,पत्ता,जुगार,दारू, सावकारी असे अनेक प्रकार पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू?
पाचोरा: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गृह विभागाने महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा उंचावण्याचे काम उल्लेखनीय पद्धतीने सुरू ठेवले आहे. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनीही मागील काळात अनेक महत्त्वाचे गुन्हे तपासाअंती मार्गी लावून जिल्हा पोलीस विभागाची प्रतिमा अधिक उंचावली आहे. मात्र, याच जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशन हद्दीतील काही महत्त्वाच्या जबाबदारीवर असलेल्या पोलिसांच्या कार्यशैलीबद्दल परिसरात शंका-कुशंका आणि चर्चांना उधाण आले आहे.
काही पोलिसांच्या कारभारावर आणि जबाबदारीवर प्रश्नचिन्ह?
पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मागील काही दिवसांपासून वाढत्या तक्रारींचा पाढा सुरू आहे. महत्त्वाच्या जबाबदारीवर नेमलेल्या पोलिसांकडून नेमके कोणते गुन्हे तपासले जात आहेत किंवा त्यांना कोणती कामे नेमून दिली आहेत, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. काही पोलिसांचे गुंड आणि अवैध धंद्याशी संबंधित लोकांशी संबंध असल्याची चर्चाही पंचक्रोशीत दबक्या आवाजात सुरू आहे. पत्रकार दिलीप जैन यांच्या माध्यमातून यापूर्वी अनेक वेळा अवैध धंद्यांवर वृत्त प्रसिद्ध झाले असले तरी, तात्पुरती कारवाई वगळता नियमितपणे ‘समाधान’ (आर्थिक देवाण-घेवाण) होत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
वरिष्ठांची नजर आणि कायद्याचे राज्य
या ‘आर्थिक देवाण-घेवाण’मध्ये सहभागी असलेले पोलीस जरी वयक्तिक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असले तरी, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांच्यावर करडी नजर असते. वरिष्ठांचा विश्वासघात केल्यास पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होण्यास वेळ लागत नाही हे मात्र पोलीस बांधवांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.
नाशिक पोलिसांचे उदाहरण कौतुकास्पद
या पार्श्वभूमीवर, शेजारील नाशिक जिल्ह्याच्या पोलीस दलाच्या उत्कृष्ट कामगिरीची आणि कार्यक्षमतेची नोंद घेत नाशिक जिल्ह्याला ‘कायद्याचा बालेकिल्ला’ म्हणून राज्यभर ओळख मिळत आहे. नाशिक पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. नाशिक पोलिसांप्रमाणेच जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलानेही आपले कार्य अधिक प्रभावी आणि निष्कलंक करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सर्व पोलीस बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!






