पाचोरातील महिलेचे एटीएम फसवणूक प्रकरण; ३.१९ लाखांची फसवणूक!

- पोलिस कर्मचारी शरद पाटील यांनी तांत्रिक बाबींचा वापर करत आरोपीला केले नागपुरातून अटक
पाचोरा (जळगाव): पाचोरा येथे एक धक्कादायक फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. जिथे फिर्यादीच्या बँक खात्यातून तब्बल 3,19,516/- (रु. ३ लाख १९ हजार ५१६) रुपये अवैधरित्या काढून घेण्यात आले होते. या प्रकरणी पाचोरा पोलिसांनी तांत्रिक तपास व कौशल्याचा वापर करून आरोपीला नागपूर येथून अटक केली आहे. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १९७/२०२५, भादंवि कलम ४२० (फसवणूक) अंतर्गत स्वीटी योगेश संघवी (वय ३८, रा. उत्राण, ता. एरंडोल, ह.मु. संघवी कॉलनी, पचोरा) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यात विशाल दीपक गायकवाड (वय २५, धंदा- लॅपटॉप रिपेरिंग, रा. फ्लॅट नंबर ७०२, सातवा मजला, अमर पॅलेस, धंतोली, नागपूर).
गुन्ह्याची थोडक्यात हकीकत:
फिर्यादी स्वीटी संघवी यांचा एच.डी.एफ.सी. बँकेचा खाते क्रमांक २१३६१०००००२५३८ होता, ज्याला त्यांचा मोबाईल नंबर ७८८८२१३२३८ लिंक होता. हा मोबाईल नंबर नंतर मोबाईल कंपनीने आरोपी विशाल गायकवाड याला दिला होता. फिर्यादीचे बँकेचे चेक बुक व एटीएम कार्ड कुरिअर कंपनीकडून डिलीव्हरीसाठी आले असताना, कुरिअर कंपनीने या नंबरवर फोन केला.
आरोपी विशाल गायकवाड याने मुद्दाम खोटे बोलून हे पार्सल नागपूर येथील त्याच्या घराच्या पत्त्यावर मागवले. पार्सल स्वीकारल्यानंतर आरोपीने त्यातील एटीएम कार्डचा पिन सेट केला. त्यानंतर २१/०३/२०२३ ते २४/०३/२०२३ या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणाहून फिर्यादीच्या बँक खात्यातून अवैधरित्या एकूण रु. ३,१९,५१६/- रुपये काढून फसवणूक केली आहे. सदर घटनेबाबत 2023 मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
पोलिसांची कारवाई:
या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना, पोलीस कॉन्स्टेबल १४२२ शरद पाटील यांनी आपले कौशल्य वापरले. त्यांनी तांत्रिक बाबींचा आधार घेत आरोपीचा शोध घेतला. अखेरीस पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोउनि. कैलास ठाकूर यांच्या मदतीने त्यांनी आरोपी विशाल दिपक गायकवाड याला नागपूर येथून अटक केली. यामुळे नागरिकांनी आपल्या बँक खात्याशी जोडलेले मोबाईल नंबर आणि गोपनीय माहिती याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.






