पाचोऱ्यात कॅन्सरग्रस्त वार्ताहर राजेंद्र खैरनार यांना पुनगावचे माजी सरपंच प्रवीण पाटील यांच्याकडून ११ हजारांची मदत! ज्येष्ठ पत्रकार संदीप महाजन यांच्या पुढाकार

पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित दीपावली फराळ आणि स्नेह भेटीच्या कार्यक्रमाला यावेळी भावनिक वळण मिळाले. परंपरेप्रमाणे आयोजित या कार्यक्रमात आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते पत्रकार बांधवांना स्नेह दिवाळी भेट वाटप करण्यात आले.
यावेळी, ज्येष्ठ पत्रकार संदीप महाजन यांनी एक महत्त्वाचा आणि मनाला भिडणारा निर्णय घेतला. त्यांनी स्वीकारलेले आर्थिक स्नेह भेट पोटाच्या कॅन्सरशी झुंज देत असलेले त्यांचे सहकारी पत्रकार राजेंद्र खैरनार यांच्या उपचारासाठी तातडीने सुपूर्द करण्याची घोषणा केली. “मी यापूर्वी कधीही कोणाचेही दिवाळी स्नेह भेट स्वीकारलेले नाही, पण या वर्षी एका भावासाठी हे आर्थिक स्नेह भेट स्वीकारत असल्याचे सांगितले आहे.
महाजन यांच्या या कृतीमुळे संपूर्ण वातावरण भावूक झाले. पत्रकार बांधवांची ही माणुसकीची मदत हीच खरी दिवाळी असल्याचे उपस्थितांना जाणवले. त्यानंतर, पुनगावचे माजी सरपंच प्रवीण पाटील यांनी तत्काळ पुढाकार घेत राजेंद्र खैरनार यांच्या उपचारासाठी ११ हजार (अकरा हजार रुपये) रोख मदत जाहीर करून त्यांच्या हाती दिली.
आमदार किशोर आप्पा पाटील यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र पाटील तसेच पत्रकार प्रवीण ब्राम्हणे यांनीही संवेदना व्यक्त करत राजेंद्र खैरनार यांना शासकीय योजना आणि उपचारांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच, व्हॉइस ऑफ मीडियाचे राहुल महाजन यांनीही खैरनार यांच्या उपचारासाठी सर्व सदस्य मिळून मदत करणार असल्याचे सांगितले आहे.
कॅन्सरशी झुंज देणाऱ्या सहकाऱ्यासाठी पत्रकार बांधवांनी दाखवलेली ही एकजूट आणि मदतीची भावना कौतुकास्पद ठरली. आमदार किशोर आप्पा पाटील, अस्मिताताई आणि इतर मान्यवरांनी पत्रकार बांधवांच्या या ऐक्याला सलाम करत आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. माणुसकी, मैत्री आणि सहकार्याच्या या दीपोत्सवाने पत्रकार राजेंद्र खैरनार यांच्या आयुष्यात आशेचा नवा दिवा प्रज्वलित केला असून, ते लवकर बरे व्हावेत यासाठी सर्वांनी सदिच्छा व्यक्त केल्या.





