पाचोरा तालुक्यातील 100 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण निश्चित! बघा
पाचोरा, दि. 08 जुलै 2025: जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार दि. 08 जुलै 2025 रोजी पाचोरा तालुक्यातील 100 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत सभा घेण्यात आली. सकाळी 11 वाजता व्यापारी भवन, पाचोरा येथे तहसीलदार पाचोरा यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी कृषिरत्न माजी आमदार तात्यासाहेब आर. ओ. पाटील उपस्थित होते. या सोडतीद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. दुपारी 2 वाजता उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला सरपंच पदांचे आरक्षण ठरविण्यात आले. या प्रक्रियेनुसार पाचोरा तालुक्यातील 100 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण सन 2025-2030 या कालावधीसाठी निश्चित करण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून, स्थानिक नेतृत्वाला चालना मिळणार आहे.

