मोटारसायकली चोरणारी गँग जळगाव LCB च्या जाळ्यात! चाळीसगाव शहर हद्दीतील गुन्हे उघड

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरट्यांच्या गटाला अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या अटकेने चाळीसगाव शहर व मेहुणबारे पोलीस ठाणे हद्दीतील तीन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोर्पीच्या ताब्यातून चोरीच्या तीन दुचाकींसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मिळून दोन लाख ४५ हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सदर कारवाई गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून करण्यात आली असून जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना दुचाकी चोरांचा माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते. संशयीत जळगाव फाटा, ता. निफाड येथून संशयीत भगवान उर्फ लंबड्या सीताराम करगळ (सोनगाव, ता.मालेगाव) यास अटक केल्यानंतर त्याने दोन साथीदारांसोबत दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. सटाणा येथून आकाश गोविंदा गायकवाड (जळगाव फाटा, निफाड) तर मालेगाव येथून दादू संजय सोनवणे (दरेगाव, ता. मालेगाव) यास अटक करण्यात आली असून आरोपींनी चाळीसगाव शहर हद्दीतून दोन तर मेहुणबारे हद्दीतून एक दुचाकी चोरीची कबुली दिली. आरोपी लंगड्या विरोधात जळगाव, नाशिक व धुळे जिल्ह्यात चोरी, जबरी चोरी, दरोडा आदी गंभीर स्वरुपाचे १३ गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, हवालदार मुरलीधर धनगर, नाईक महेश पाटील, कॉन्स्टेबल भूषण शेलार, सागर पाटील, मिलिंद जाधव, चालक दीपक चौधरी, हवालदार भारत पाटील आदींच्या पथकाने केली.
