बीड जिल्ह्यात घडलेली निर्घृण हत्या म्हणजे राज्याच्या सुरक्षेचा व्यवस्थेच्या अभ्यासाचे जिवंत उदाहरण : दिलीप बळीराम खोडपे (सर)

बीड जिल्ह्यात घडलेली निर्घृण हत्या म्हणजे राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेच्या अपयशाचे जिवंत उदाहरण आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आणि आता या क्रूर घटनेचे व्हिडिओ आणि फोटो समोर येत आहेत. ही केवळ एक हत्या नाही, तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वाढत्या बेमालूम समर्थनाचे परिणाम आहे.
आज समोर आलेले हे धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ केवळ एका व्यक्तीच्या हत्येची नाही, तर संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाची साक्ष देतात. या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसते की, संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने अमानुष मारहाण करण्यात आली. निर्दयीपणे त्यांच्यावर वार करण्यात आले, रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात त्यांना सोडण्यात आले. हे दृश्य पाहून कोणाचेही काळीज पिळवटून जाईल.
● गुन्हेगार सापडले, पुरावे सापडले पण अजूनही कठोर कारवाई का नाही?
या हत्याकांडातील आरोपींना अटक झाली असली, तरी अजूनही कठोर शिक्षा झालेली नाही. ज्या गुन्हेगारांनी भररस्त्यात हा थरार उडवला, त्यांच्या मागे कोण होते? त्यांना मोकळीक कशी मिळाली? सरकार आणि प्रशासन यावर काही ठोस पावले उचलत आहेत का, की पुन्हा सर्वकाही निवळून जाईल?

या अमानुष हत्येच्या फोटोंनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला असला, तरी अजूनही सरकारकडून आरोपीविरोधात कोणतीही ठोस कृती झालेली नाही. सरपंच असलेल्या व्यक्तीला भररस्त्यात मारले जाते आणि २ महिन्यानंतर आजही न्यायासाठी संघर्ष करावा लागतो, ही बाब संतापजनक आहे.
● जनतेला अशा व्यवस्थेला जाब विचारला पाहिजे.
या हत्येच्या पार्श्वभूमीवर आता जनतेने आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत पुनश्च एकदा आवाज उठवण्याची वेळ आली आहे. कायद्याचे राज्य राहील की गुन्हेगारांचे? हा प्रश्न आज प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. या गुन्ह्याच्या मुळाशी कोण आहेत हे सर्वांना माहीत आहेत पण त्यांना पोसणारी व्यवस्था कोणत्या नेत्यांच्या आशीर्वादाने बळकट होत आहे? याचा विचार व्हायला हवा.
सरकारमध्ये बसलेल्या व्यक्तींनी जर आपले हात झटकले, तर पुढील काळात देखील गुन्हेगार अधिकच निर्भय होतील. त्यामुळे केवळ राजीनामा घेऊन जबाबदारी संपत नाही, तर या सगळ्याच्या मुळाशी जाऊन दोषींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. व योग्य तो संदेश गुन्हेगारी जगतात गेला पाहिजे. अन्यथा, आज सरपंचाचा बळी गेला, उद्या कोणाचाही जाऊ शकतो.
राज्याच्या प्रशासनाने आणि जनतेने डोळे उघडून या घटनांचा निषेध केला पाहिजे. नाहीतर कायद्याचे राज्य संपून जंगलराज सुरू होण्यास वेळ लागणार नाही!