पाचोरा भाजपा कार्यालयात पत्रकार दिन उत्साहात संपन्न; पत्रकार बांधवांचा ‘भव्य सन्मान’

पाचोरा:लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेच्या तेजस्वी कार्याचा गौरव करण्यासाठी भाजपा मध्यवर्ती कार्यालय, पाचोरा येथे पत्रकार दिनानिमित्त एका भव्यदिव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पाचोरा पंचक्रोशीतील पत्रकारांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव केला. “पत्रकार हा खऱ्या अर्थाने समाजाचा आरसा आहे. जनतेच्या मनातील वेदना, अपेक्षा आणि आशा आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने मांडण्याचे काम पत्रकार करत असतात. सत्य परिस्थितीचे निर्भीड आणि प्रामाणिक दर्शन घडविण्याचे कार्य पत्रकार वर्ग अत्यंत निःस्वार्थपणे पार पाडत आहे,” अशा शब्दांत मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवून पत्रकारांशी संवाद साधला. याठिकाणी वैशालीताई सूर्यवंशी (भाजपा नेत्या),अमोलभाऊ शिंदे,संजय नाना वाघ,मधुभाऊ काटे,श्री. सुभाष पाटील,बन्सीलाल पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वातावरण आदर आणि आत्मीयतेने भारावून गेले होते. स्वतःचा सन्मान होताना पाहून अनेक पत्रकार बांधव भावूक झाले होते. समाजाच्या प्रत्येक स्तरातील सत्य समोर आणणाऱ्या या ‘लेखणीवीरांचा’ सन्मान करणे म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांना बळ देणारा एक प्रेरणादायी क्षण असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सांगतेवेळी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.





