थायलंडमध्ये जळगावच्या मोहोर! आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पाचोऱ्यातील पैलवान हितेश पाटीलला ‘सुवर्ण’

बँकॉक (थायलंड):
थायलंडमधील बँकॉक येथे पार पडलेल्या इंटरनॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप २०२६ मध्ये जळगाव जिल्ह्याचा सुपुत्र पैलवान हितेश अनिल पाटील याने देदीप्यमान कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पोर्ट ऑर्गनायझेशन कमिटीच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेत हितेशने यजमान थायलंडच्या पैलवानाला चितपट करून भारताचा तिरंगा डौलाने फडकवला.

या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये भारत, मलेशिया, थायलंड आणि श्रीलंका या देशांतील नामवंत कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. १२५ किलो वजनी गटात हितेश पाटीलची निवड करण्यात आली होती. वरिष्ठ गटातून खेळताना हितेशने आपल्या ताकदीच्या आणि कौशल्याच्या जोरावर अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम लढतीत त्याने यजमान थायलंडच्या खेळाडूवर वर्चस्व गाजवत विजय मिळवला आणि सुवर्णपदक आपल्या नावावर केले.
भारताचा संघ ‘मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन इंडिया’ च्या माध्यमातून या स्पर्धेत सहभागी झाला होता. बेळगाव येथे पार पडलेल्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर हितेशची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली होती. आशियाई सुवर्णपदक विजेते आणि संघटनेचे सरचिटणीस प्रा. पै. अमोल साठे यांचे हितेशला मोलाचे मार्गदर्शन लाभले.
पैलवान हितेश पाटील हा महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतो. तो शिवसेना तालुकाप्रमुख विनोद तावडे यांचा मावस पुतण्या आहे. त्याच्या या यशामुळे केवळ जळगाव जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.
“हितेशच्या या यशामुळे भारतीय कुस्तीपटूंना एक नवे जागतिक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. ग्रामीण भागातील टॅलेंट जेव्हा जागतिक स्तरावर चमकते, तेव्हा देशाचा अभिमान वाढतो.”
— संयोजक समिती, मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशनहितेशच्या या यशानंतर क्रीडा क्षेत्रातून आणि राजकीय स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशाबद्दल मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.





