पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; अवघ्या १२ तासांत चोरटा जेरबंद, न्यायालयात दोषारोपपत्रही सादर

पाचोरा (मधुर खान्देश वृत्तसेवा): पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आपली कार्यक्षमता सिद्ध करत, मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली आहे. पोलिसांनी केवळ आरोपीला पकडलेच नाही, तर चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून १२ तासांच्या विक्रमी वेळेत न्यायालयात दोषारोपपत्र देखील दाखल केले आहे.
दि. १८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३:२५ वाजेच्या सुमारास, कृष्णापुरी (पाचोरा) येथील रहिवासी आणि स्वीट मार्ट व्यावसायिक किशोर आनंदराव नरेराव यांनी आपली चारचाकी गाडी उभी केली होती. गाडीत पॉवर बँकेला लावून ठेवलेला त्यांचा मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने लांबवला. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २१/२०२६ नुसार रात्री ९:२३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने वेगाने सूत्रे हलवली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू असताना, पथकाला एक संशयित इसम परिसरात फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव सौरभ नाना भिल (गायकवाड) (वय २५, रा. कळमसरे, ता. पाचोरा) असे सांगितले.
पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच पहूर पोलीस ठाणे हद्दीतूनही अशाच प्रकारे मोबाईल चोरल्याची कबुली त्याने दिली.
पोलिसांनी आरोपीकडून एकूण ३०,००० रुपये किमतीचे दोन मोबाईल हस्तगत केले आहेत:
१५,००० रुपये किमतीचा शॉओमी (Xiaomi) कंपनीचा निळ्या रंगाचा फोन.
५,००० रुपये किमतीचा विवो (Vivo Y27 Pro) फोन.
(टीप: इतर मुद्देमालासह एकूण किंमत ३०,००० रुपये)
या प्रकरणाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे तपास अधिकारी पोहेकॉ राहुल शिंपी यांनी अवघ्या १२ तासांत तपास पूर्ण करून पाचोरा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. आरोपीची रवानगी धुळे सबजेलमध्ये करण्यात आली आहे. सदर कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार तसेच
- पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी (तपास अधिकारी)
- पोहेकॉ अशोक रामचंद्र हटकर
- सफौ गणेश विरभान पाटील
- पोकॉ शरद मांगो पाटील
- पोकॉ संदीप किसन भोई
यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या जलद कारवाईचे पाचोरा परिसरात कौतुक होत आहे.






