वडगाव कडे येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ उत्साहात संपन्न!मराठी तारका सोनाली कुलकर्णी आणि आमदार किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती

पाचोरा: पाचोरा तालुक्यातील वडगाव कडे येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाले. या कार्यक्रमाला मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभली होती, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल (IAS), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, भाऊसाहेब अकलाडे, गट विकास अधिकारी सुधाकर मुंडे आणि माजी जि.प. सदस्य मधुभाऊ काटे यांची प्रमुख उपस्थिती होती. मीनल करणवाल आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या सक्षमीकरणावर आणि शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर मार्गदर्शन केले असून आमदार किशोर पाटील यांनी ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘समृद्ध पंचायतराज अभियान’ ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत स्वच्छ आणि सुंदर गावाचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
या सोहळ्याला जिल्हा परिषदेचे विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि वडगाव कडे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील विकासात्मक कामांचे यावेळी कौतुक करण्यात आले असून, प्रशासकीय यंत्रणा आणि जनता यांच्यातील समन्वय या निमित्ताने अधिक दृढ झाला.





