पाचोऱ्याजवळ भीषण अपघात: दोन तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जण जखमी… ॲम्ब्युलन्स चालकांनी दरवाजा तोडून मृतदेह काढले बाहेर! वेळेवर पाणी टाकले म्हणून लागली नाही आग….

पाचोरा (राहुल महाजन,संपादक): पाचोरा-जळगाव रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कारचालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील काही तरुण इनोव्हा कारने पाचोरा तालुक्यातील एका गावात कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून जळगावकडे परतत असताना, मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पाचोरा-जळगाव रस्त्यावरील एका हॉटेलजवळ हा भीषण अपघात घडला आहे. वेगात असलेल्या कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन जोरदार धडकले. ही धडक इतकी भीषण होती की कार दोन ते तीन वेळा पलटी झाली. या अपघातात महावितरणचा विजेचा तारा देखील तुटल्या असून कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या दुर्दैवी घटनेत खालील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून श्रीरंग सुरेश पाटील,प्रसन्न रवींद्र निमजे यांचा इनोव्हा गाडीचा दरवाजा तोडून मृतदेह रुग्णवाहिका चालकांनी या ठिकाणी काढला आहे. तसेच गाडीचे रेडिएटर खूप गरम झाल्याने या ठिकाणी गाडीला आग लागण्याची परिस्थिती लक्षात येता रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांनी तात्काळ या गाडीवर पाणी टाकून गाडीला आग लागण्यापासून वाचवले आहे. अपघातातील इतर जखमींना पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता या ठिकाणी डॉक्टर सागर गरुड यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ योग्य उपचार देत त्यांचे जीव या ठिकाणी वाचवले आहे.तर गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी तातडीने जळगाव येथे हलवण्यात आले असल्याची देखील माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक बबलू मराठे,भागवत पाटील, गोलू पाटील तसेच किशोर लोहार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना कळविले होते. घटनेचे गांभीर लक्षात घेता पाचोरा पोलिस कर्मचारी गजानन जोशी,दिलीप पाटील,दिलीप वाघमोडे,अशोक पाटील,वाशिम शेख,गजानन देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार करत आहेत.





