पाचोरा पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचा एल्गार; न्याय्य हक्कासाठी बेमुदत ‘काम बंद’ आंदोलन सुरू

पाचोरा (मधुर खान्देश वृत्तसेवा): प्रशासकीय यंत्रणेचा कणा मानल्या जाणाऱ्या लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय व हक्कासाठी आरपारची लढाई पुकारली आहे. ‘जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या’ नेतृत्वाखाली पाचोरा पंचायत समितीमधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २३ फेब्रुवारी २०२६ पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्मचाऱ्यांनी ‘असहकार’ पुकारल्यामुळे पंचायत समितीचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नाही, असा पवित्रा संघटनेने घेतला आहे. दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी संघटनेच्या वतीने पाचोरा तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे रीतसर निवेदन सादर करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष प्रशांत उगले करत असून, त्यांच्यासोबत पदाधिकारी व सदस्य सक्रिय सहभाग नोंदवला आहे यामध्ये उपाध्यक्ष महेंद्र रमेश बागुल,सतिष पाटील ज्येष्ठ सल्लागार विजय शांताराम सावळे, राजेश तागवले,नंदकिशोर पाटील, जितेंद्र बडगुजर तसेच राकेश गोसावी, बापू मोरे, संजय पाटील, श्री. शैलेश मोहिते, श्री. किशोर पाटील, दीपक बडगुजर, दीपक मगर, वसंत बारी.
“प्रशासकीय कामाचा भार उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. आता हक्क मिळेपर्यंत आमचा हा लढा आणि असहकार सुरूच राहील.”
— प्रशांत उगले (अध्यक्ष)या आंदोलनात पंचायत समिती अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता शासनाच्या भूमिकेकडे लागले आहे.





