नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोऱ्यातील आधुनिक युगातील बस स्थानक ‘अंधारात’; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! पाचोरा बस स्थानक ठरतोय “ब्लॅक स्पॉट”


Advertisements
Ad 4

पाचोरा: पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या माध्यमातून पाचोरा बसस्थानकाचा कायापालट झाला खरा, मात्र सध्या या आधुनिक बसस्थानकाला अंधाराचा विळखा पडला आहे. बसस्थानक परिसरात पथदिव्यांचा अभाव असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले यांनी येथे तातडीने हायमास्ट किंवा फोकस लाईट बसवण्याची मागणी केली आहे.

आमदार किशोरआप्पा पाटील यांनी आपल्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन बसस्थानकाचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण केले आहे. आज बसस्थानकाची इमारत आधुनिक दिसत असली, तरी देखभालीच्या अभावामुळे रात्रीच्या वेळी हा परिसर ‘ब्लॅक स्पॉट’ ठरत आहे. सायंकाळी ६ वाजेनंतर आणि पहाटे ५ ते ६:३० या गर्दीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधारात असतो. ग्रामीण भागातील नागरिक, नोकरीनिमित्त ये-जा करणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि विशेषतः महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अंधारामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याची आणि अपघातांची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. वृद्ध प्रवाशांना तर चालणेही कठीण झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले यांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले की,

“आमदारांच्या प्रयत्नातून बसस्थानकाचे रूप पालटले आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. मात्र, अंधारामुळे या विकासाचा प्रवाशांना पूर्ण लाभ मिळत नाहीये. एसटी महामंडळाने तातडीने बसस्थानकाच्या चारही बाजूंनी उच्च क्षमतेचे फोकस लाईट लावावेत, जेणेकरून प्रवाशांना सुरक्षित वाटेल असे मत अनिल येवले यांनी व्यक्त केले आहे.”

पाचोरा हे तालुक्याचे मुख्य केंद्र असल्याने बसस्थानक हे शहराचे प्रवेशद्वार मानले जाते. या ठिकाणी असणारा अंधार शहराच्या प्रतिमेला तडा देणारा आहे. त्यामुळे एसटी महामंडळ, नगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाने समन्वय साधून आमदार निधीतून किंवा महामंडळाच्या विशेष निधीतून प्रकाशव्यवस्था कार्यान्वित करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
आता प्रशासन या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन प्रवाशांना ‘प्रकाश’ देते की ही समस्या अशीच रेंगाळत राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button