पाचोरा नगरपरिषदेचा ‘स्वच्छता व तक्रार निवारण’ धडाका; कृष्णापुरी भागात मोहिमेची यशस्वी सांगता

पाचोरा (मधुर खान्देश वृत्तसेवा):
शहरातील नागरी समस्यांची जागेवरच सोडवणूक करण्यासाठी आणि स्वच्छतेचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी पाचोरा नगरपरिषदेच्या वतीने ‘नगरपरिषद आपल्या दारी – स्वच्छता व तक्रार निवारण मोहीम’ राबवण्यात येत आहे. २६ जानेवारीपासून सुरू झालेल्या या विशेष मोहिमेअंतर्गत, प्रभाग क्रमांक १४ (कृष्णापुरी) येथील तक्रार निवारण शिबिराची नुकतीच यशस्वी सांगता झाली.
लोकसहभागातून स्वच्छतेचा संकल्प
माजी नगराध्यक्षा सौ. सुनिता किशोरआप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबवण्यात आली होती. प्रशासकीय कामात सुसूत्रता आणणे आणि नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, हा या मोहिमेमागचा मुख्य उद्देश आहे. कृष्णापुरी भागातील शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या प्रभागातील समस्या मांडल्या आहे. यामध्ये कचरा संकलन, सांडपाणी निचरा आणि पथदिव्यांच्या समस्यांवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली आहे. नगरपरिषद प्रशासन आणि नागरिक यांच्यात थेट संवाद झाल्यामुळे कामात पारदर्शकता आली असून “स्वच्छ पाचोरा, सुंदर पाचोरा” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नागरिकांना ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
“शहराचा विकास केवळ प्रशासनामुळे नाही, तर नागरिकांच्या सहभागातून होतो. ‘नगरपरिषद आपल्या दारी’ या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रभागातील समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.”
— सौ. सुनिता किशोरआप्पा पाटील (नगराध्यक्षा,पाचोरा न. पा)कृष्णापुरी भागातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतः प्रशासन दारी येत असल्याने सामान्यांचा वेळ आणि श्रम वाचत आहेत. प्रभाग क्र. १४ मधील नियोजित कामांच्या आढाव्यानंतर या भागातील मोहिमेची सांगता करण्यात आली.





