नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याशैक्षणिक

थेरोळेच्या सुपुत्राची गगनभरारी: अमोल भालेराव यांची ‘IBPS RRB PO’ क्लास-१ अधिकारी पदी निवड


Advertisements
Ad 4

रावेर (मधुर खान्देश वृत्तसेवा): कष्टाची तयारी आणि जिद्द असेल तर परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे रावेर तालुक्यातील थेरोळे येथील अमोल मधुकर भालेराव यांनी सिद्ध केले आहे. अमोल यांची ‘IBPS RRB PO’ (Probationary Officer) या क्लास-१ अधिकारी पदावर निवड झाली असून, त्यांच्या या यशाने संपूर्ण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अमोल यांचा प्रवास अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. एका साध्या आणि मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अमोल यांनी घरच्या बेताच्या परिस्थितीची जाणीव ठेवून आपले शिक्षण पूर्ण केले. स्पर्धा परीक्षेच्या खडतर प्रवासात अनेक अडचणी आल्या, मात्र चिकाटी आणि सातत्य न सोडता त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या ‘IBPS RRB’ परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. अमोल यांची अधिकारी पदी निवड झाल्याची बातमी थेरोळे गावात धडकताच ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला.
ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांचे औक्षण केले. “अमोलने प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेले हे यश परिसरातील इतर विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभासारखे ठरेल,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. अमोल हे पाचोरा येथील वार्ताहर गौतम सोनवणे यांचे शालक आहेत. त्यांच्या या यशामुळे भालेराव आणि सोनवणे परिवारात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, रावेर तालुक्याचे नाव त्यांनी राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे.

“कठोर परिश्रम आणि आई-वडिलांचे आशीर्वाद यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. ग्रामीण भागातील मुलांनी आत्मविश्वासाने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते.”
— अमोल भालेराव (नवनियुक्त अधिकारी)


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button