नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्यराष्ट्रीय

पाचोरा तालुक्यातील रेल्वे क्रॉसिंगचा अडथळा दूर; ‘त्या’ गावांमधील शेतीपंपाचा वीजपुरवठा अखेर सुरळीत


Advertisements
Ad 4

पाचोरा (मधुर खान्देश वृत्तसेवा) : पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक जवळील रेल्वे क्रॉसिंगच्या परवानगीअभावी रखडलेला वीजपुरवठ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून खेडगाव नंदीचे, पहाण, मोहाडी, बिल्दी आणि धरण परिसरातील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र, प्रशासन, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसार माध्यमांच्या समन्वयाने हा तांत्रिक पेच सुटल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

• पिके वाचवण्यासाठी धावपळ, शेतकऱ्यांमध्ये होता असंतोष

रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याची ऐन वेळ असतानाच वडगाव पुढील रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी तांत्रिक कारणास्तव वीजपुरवठा खंडित झाला होता. रेल्वे प्रशासनाच्या परवानगीअभावी हे काम रखडले होते. परिणामी, परिसरातील पाच ते सहा गावांमधील शेती पिकांना पाणी मिळणे बंद झाले होते. डोळ्यादेखत पिके करपू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत तालुक्यातील आमदार किशोर पाटील तसेच सत्तेतील तसेच विरोधी पक्षातील राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. तसेच ‘मधुर खानदेश’ वृत्तपत्राचे संपादक राहुल महाजन यांनी महावितरणचे अभियंता प्रमोद हेलोडे यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आणि वरिष्ठ स्तरावर समन्वय साधून प्रश्न सोडवण्याची विनंती केली.

यानंतर महावितरण पाचोरा विभाग आणि रेल्वे प्रशासन भुसावळ यांच्यात तातडीने समन्वय साधण्यात आला. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तांत्रिक कामासाठी आवश्यक परवानगी दिली. परवानगी मिळताच खेडगाव नंदीचे येथील अभियंता धनंजय पाटील, त्यांचे सहकारी वायरमन आणि ठेकेदारांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी केबल जोडणीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. वीजपुरवठा सुरळीत झाल्याने आता धरण परिसरातील आणि बाधित गावांमधील पिकांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

“शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महावितरण आणि रेल्वे प्रशासनाने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागला असल्याची प्रतिक्रिया पहाण येथील शेतकरी अतुल नारायण महाजन तसेच सचिन महाजन यांनी व्यक्त केली आहे.

कामातील तत्परतेबद्दल खेडगाव नंदीचे येथील महावितरणचे अभियंता धनंजय पाटील व त्यांच्या टीमचे शेतकऱ्यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले असून, सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button