“मी चोरी केली नाही”……हॉटेल व्यवस्थापनाच्या जाचाला कंटाळून पाचोरा तालुक्यातील तरुणाची पुण्यात आत्महत्या

पुणे/पाचोरा: (राहुल महाजन, पत्रकार) | पोटाची खळगी भरण्यासाठी आणि उज्वल भविष्याचे स्वप्न उराशी बाळगून ग्रामीण भागातून शहराकडे गेलेल्या एका होतकरू तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील रहिवासी असलेल्या मयत अतुल लक्ष्मण अहिरे या युवकाने पुणे येथे हॉटेल व्यवस्थापनाच्या त्रासाला कंटाळून रेल्वे समोर आत्महत्या केली असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. चोरीचा खोटा आळ आणि झालेली मारहाण सहन न झाल्याने अतुलने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याबाबतची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली असल्याबाबत मयताच्या नातेवाईकांना माहिती दिली.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अतुल अहिरे हा पुणे येथील ‘प्रणा रिसॉर्ट अँड बँक्वेट हॉल’ येथे कार्यरत होता. सदर हॉटेलच्या व्यवस्थापनाने अतुलवर चोरीचा संशय घेऊन त्याला बेदम मारहाण केली होती. अतुलने वारंवार “मी चोरी केली नाही” असे सांगून विनवण्या केल्या, मात्र व्यवस्थापनाने त्याचे काहीही न ऐकता त्याला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला.
इंस्टाग्रामवरील तो शेवटचा मेसेज…
आत्महत्या करण्यापूर्वी अतुलने सोशल मीडियाचा आधार घेत आपली व्यथा मांडली. त्याने स्वतःलाच इंस्टाग्रामवर मेसेज पाठवला की,
“मी काहीही चुकीचे केले नसताना माझी विनाकारण बदनामी केली जात आहे. ही बदनामी मी सहन करू शकत नाही, त्यामुळे आता मला जगावेसे वाटत नाही.” हा मेसेज पाठवल्यानंतर त्याने आपले जीवन संपवले. या घटनेमुळे शिंदाड गावासह पाचोरा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
दोषींवर गुन्हे दाखल:
याप्रकरणी मयत अतुलचे बंधू स्वप्नील अहिरे यांनी पुणे येथील फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तक्रारीवरून प्रणा हॉटेलचे एच.ओ.डी. (HOD) व तरुण साचवणी (प्रॉपर्टी डायरेक्टर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मंत्र्यांकडे तसेच आमदारांकडे न्यायाची मागणी?
ग्रामीण भागातील तरुण मोठ्या आशेने शहरात कामाला जातात, मात्र तिथे त्यांच्यावर होणारे असे अत्याचार रोखणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर, पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शासनाने कडक पावले उचलावीत, अशी आर्त हाक शिंदाड ग्रामस्थांनी दिली आहे.





