‘हिंद की चादर’ सोहळ्यासाठी पाचोरा तालुक्यातून भाविक रवाना; तहसीलदार विजय बनसोडे यांनी दाखवला हिरवा कंदील

पाचोरा: हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी समागम पर्वाचे आयोजन नवी मुंबईतील खारघर येथे करण्यात आले आहे. ‘हिंद की चादर’ या विशेष सोहळ्यासाठी पाचोरा तालुक्यातील बंजारा, लभाना, शिख, शिकलकरी, सिंधी, उदासीन आणि वारकरी संप्रदायाचे भाविक मोठ्या उत्साहात रवाना झाले. याप्रसंगी पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांनी उपस्थित राहून भाविकांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र शासनाच्या वतीने २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी आयोजित या भव्य कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुचित्रा पवार यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रमुख मंत्री उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे स्वरूप आणि उद्देश
इतिहासाचे जागरण: गुरु तेग बहादूर, गुरु गोविंद सिंग आणि चार साहिबजादे यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचा इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
विविध समाजांचा सहभाग: बंजारा, लुभाना, मोहिवाल, शिंदी, जोहरी आणि उदासी यांसारख्या गुरु नानक नामलेवा संगतीतील विविध समाजांचा यात सक्रिय सहभाग असून, त्यांच्या शौर्याचे आणि त्यागाचे स्मरण या निमित्ताने केले जात आहे.
नियोजन: २७ फेब्रुवारी रोजी नगर कीर्तन पार पडले, तर २८ फेब्रुवारी रोजी नामवंत संत-महंतांचे प्रवचन होणार आहे. १ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधित करतील. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातून सुमारे १५ लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. मुख्यमंत्री सहायता कक्षाचे मुख्य संयोजक व आरोग्य दूत रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांच्या निवास आणि भोजनाची भव्य व्यवस्था करण्यात आली आहे.
पाचोरा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार विजय बनसोडे यांच्या वतीने शुभेच्छा देत तालुक्यातील भाविकांचा हा भाविक नवी मुंबईकडे मार्गस्थ झाले आहे.





