गिरणा काठावर महसूल विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; वाळू माफियांना रोखण्यासाठी नदीपात्रच खोदले!

पाचोरा:गिरणा नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा आणि त्यामुळे विस्कळीत झालेला पाणीपुरवठा यावर महसूल विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कठोर कारवाई केली आहे. कुरंगी आणि माहिजी परिसरात महसूल पथकाने थेट नदीपात्रात जाणारे रस्तेच खोदून काढल्याने वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना आता चाप बसणार आहे.
पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने कारवाईचा बडगा
गेल्या काही दिवसांपासून कुरंगी आणि माहिजी परिसरातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. या उपसामुळे नदीपात्राची मोठ्या प्रमाणावर धूप झाली असून, गावांना होणारा पाणीपुरवठा गढूळ झाला होता. ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारी आणि पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन महसूल विभागाने हे धाडसी पाऊल उचलले आहे.
- अवैध रस्ते केले उद्ध्वस्त
मंडळाधिकारी वैशाली पाटील आणि कुरंगीच्या तलाठी वर्षा काकुसते यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. वाळू माफियांकडून नदीपात्रात वाहने नेण्यासाठी तयार करण्यात आलेले कच्चे रस्ते जेसीबीच्या साहाय्याने खोदून काढण्यात आले. रस्ताच उरला नसल्याने आता जड वाहने नदीपात्रात शिरणे अशक्य झाले आहे.
“अवैध वाळू उपसामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला होता. यापुढेही अशाच प्रकारची कडक कारवाई सुरू राहील आणि वाळू चोरीला थारा दिला जाणार नाही.”
— तहसीलदार,पाचोरा
- जागेवरच उपाय: केवळ दंड न आकारता रस्तेच खोदल्यामुळे कायमस्वरूपी प्रतिबंध.
- गढूळ पाण्याची समस्या: पाणीपुरवठा सुधारण्यासाठी प्राधान्याने पाऊल.
- महिला अधिकाऱ्यांचे धाडस: मंडळाधिकारी वैशाली पाटील व तलाठी वर्षा काकुसते यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून ही मोहीम फत्ते केली. या कारवाईमुळे परिसरात वाळू चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, प्रशासनाच्या या भूमिकेचे सर्वसामान्य नागरिकांमधून स्वागत होत आहे.






