भैरवनाथ मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम; दर रविवारी ‘बासमती खिचडी’ प्रसादाची अखंड परंपरा!

पाचोरा (मधुर खान्देश वृत्तसेवा) :
शहरातील बहिरमनगर येथील श्री भैरवनाथ देवस्थान मंदिरात श्रद्धेचा आणि सेवेचा एक अनोखा संगम बघायला मिळाला आहे. पौष महिन्यातील शेवटच्या रविवारी घेतलेल्या एका धार्मिक संकल्पाची पूर्तता करत, भैरवनाथ मित्र मंडळाच्या वतीने दर रविवारी भाविकांना बासमती तांदळाच्या खिचडीचा प्रसाद वाटप करण्याची परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे.
सावखेडा येथील पौष महिन्यातील शेवटच्या रविवारी आयोजित दाळपट्टी कार्यक्रमात भैरवनाथ मित्र मंडळाने एक विशेष संकल्प सोडला होता. केवळ सण-उत्सवापुरते मर्यादित न राहता, दर रविवारी बालगोपाळांसह सर्व भाविकांना पौष्टिक आणि दर्जेदार प्रसाद मिळावा, हा यामागचा मुख्य उद्देश होता. रविवार, १ मार्च २०२६ रोजीही ही परंपरा भक्तिमय वातावरणात पार पडली.
या रविवारी झालेल्या प्रसाद वाटपासाठी बहिरमनगर परिसरासह आजूबाजूच्या गावांतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विशेषतः लहान मुलांसाठी हा खिचडी प्रसाद आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांसाठी स्वतंत्र रांगा लावून शिस्तबद्ध पद्धतीने वितरण करत “जय भैरवनाथ” च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. बासमती तांदळाचा दर्जा आणि प्रसादाची चव यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, ग्रामस्थांनी या सेवाभावी उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे. ही परंपरा अशीच पिढ्यानपिढ्या अखंड सुरू राहावी, अशी भावना यावेळी उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.





