चोपडा राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; ७.८१ लाखांच्या बनावट मद्यासह बोलेरो पिकअप जप्त

चोपडा (मधुर खान्देश वृत्तसेवा):
होळी आणि भोंगऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्री आणि वाहतुकीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून मध्य प्रदेश निर्मित आणि बनावट मद्याची वाहतूक करणारी एक बोलेरो पिकअप गाडी जप्त करण्यात आली असून, एकूण ७ लाख ८१ हजार १० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जळगाव अधीक्षक डॉ. विठ्ठल भुकन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात विशेष मोहीम राबवली जात आहे. याच दरम्यान, चोपडा विभागाचे जवान भूषण परदेशी यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, उनपदेव-वर्डी रस्त्यावर एका चारचाकी वाहनातून अवैध मद्याची विक्री होणार आहे त्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पथकाने उनपदेव शिवारात सापळा रचला असता यावेळी भोंगऱ्या-होळी उत्सवाच्या ठिकाणी उभ्या असलेल्या महिंद्रा बोलेरो पिकअप (क्रमांक MP-46-ZB-8454) मधून मद्यविक्री सुरू असल्याचे दिसून आले. पथकाने तात्काळ धाड टाकून वाहन आणि मद्य साठा जप्त केला असून यामध्ये माउंट ६००० स्ट्रॉंग बिअर (मध्य प्रदेश निर्मित) ३६६ बाटल्या (किंमत ४२,०९०/-), बनावट देशी दारू (टँगो पंच १८० मि.लि.) २७३ बाटल्या (किंमत २१,८४०/-), बनावट देशी दारू (टँगो पंच ९० मि.लि.) २६२ बाटल्या (किंमत १०,४८०/-), बनावट रॉयल स्टॅग (१८० मि.लि.) २४ बाटल्या (किंमत ६,०००/-),महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन: (किंमत ७,००,०००/-) तसेच इतर साहित्य (दोन प्लास्टिक टब): (किंमत ६००/-) असा एकूण किंमत ७,८१,०१०/- रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अत्तरसिंग मांगिलाल बारेला (वय २७) आणि विकास बिरसिंग बारेला (वय २९), दोन्ही राहणार मुळ्या उतार, पोस्ट वैजापूर, ता. चोपडा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५ (अ) (ई), ८०, ८१, ८३, ९० व १०८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई निरीक्षक अब्दुल कैय्युम सु. मोमीन, दुय्यम निरीक्षक निकिता खपके, जवान भूषण परदेशी, कुणाल सोनावणे, नितीन पाटील, दिनेश पाटील आणि वाहनचालक विपुल राजपूत यांच्या पथकाने केली. या कारवाईत जळगाव भरारी पथकाचे निरीक्षक अशोक तारू, दुय्यम निरीक्षक योगेश सूर्यवंशी, जवान राहुल सोनवणे,नरेंद्र पाटील तसेच महिला जवान पूनम पाटील यांच्यासह टीमनेही मोलाचे सहकार्य केले.
प्रशासनाचे आवाहन:
अवैध मद्य निर्मिती, वाहतूक किंवा विक्री संदर्भात माहिती असल्यास जनतेने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००३३९९९९ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.






