नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणराज्य

मोठी बातमी: उत्तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप! उन्मेष पाटील यांचा ‘धनुष्यबाण’ हाती घेण्याचा निर्णय; जळगावच्या राजकारणाला नवी कलाटणी


Advertisements
Ad 4

जळगाव/चाळीसगाव: जळगाव जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. चाळीसगावचे माजी आमदार आणि भाजपचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी अखेर शिवसेना (ठाकरे गट) सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. विशेष म्हणजे, पाचोऱ्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मध्यस्थीने हा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याने जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबईत आज शक्तीप्रदर्शन; २०० वाहनांचा ताफा रवाना

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज ६ मार्च २०२६ रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा अधिकृत प्रवेश सोहळा पार पडेल. या सोहळ्यासाठी चाळीसगावातून मोठी तयारी करण्यात आली असून, जवळपास २०० वाहनांचा ताफा, माजी नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्त्यांसह उन्मेष पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. ‘मधुर खान्देश’ने यासंदर्भात उन्मेष पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

चाळीसगाव-पाचोरा समीकरणांचा नवा पेच

जळगाव जिल्ह्यातील राजकारण सध्या चौरंगी वळणावर आहे. एकीकडे पाचोऱ्यात भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) असा सुप्त संघर्ष पाहायला मिळाला होता, जिथे आमदार किशोर पाटील यांनी आपली सत्ता अबाधित राखली आहे. तर दुसरीकडे चाळीसगावात आमदार मंगेश चव्हाण यांनी भाजपची ताकद सिद्ध केली आहे. उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता उन्मेष पाटील यांनी सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे चाळीसगावात भाजप विरुद्ध शिवसेना असा नवा सामना रंगणार की ‘महायुती’चा धर्म पाळून दोन्ही नेते विकासासाठी एकत्र येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहेत राजकीय चर्चा?

  • वर्चस्वाची लढाई: मंगेश चव्हाण यांनी चाळीसगावात भाजपला प्रथम क्रमांकाचा पक्ष बनवले आहे, तर किशोर पाटील यांनी पाचोरा-भडगावमध्ये शिवसेनेचे वर्चस्व सिद्ध केले आहे.
  • शीतयुद्धाचा शेवट की सुरुवात?निवडणुकीच्या काळात मंगेश चव्हाण आणि किशोर पाटील यांच्यात दिसलेले ‘शीतयुद्ध’ आता उन्मेष पाटील यांच्या प्रवेशानंतर काय होईल हे देखील बघणे गरजेचे आहे.
  • कार्यकर्त्यांची भूमिका: दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या नेत्यांसाठी आग्रही असताना, वरिष्ठ पातळीवर होणारी ही जवळीक सामान्य जनतेच्या विकासासाठी फलदायी ठरेल का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

जळगाव जिल्ह्यातील दोन मातब्बर तालुक्यांमधील हे बदललेले राजकीय वारे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत कुणाचे पारडे जड करतात, हे लवकरच स्पष्ट होईल.

चौकट:
शिवसेना पक्ष वाढीसाठी नेहमीच आमदार किशोर पाटील यांचा तळागाळातला कार्यकर्त म्हणून प्रयत्न असतो. ज्याप्रमाणे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टी पक्ष मजबूत करण्यासाठी पाचोर्‍यातील अनेक नेत्यांचा प्रवेश करून घेतला होता आणि पक्षासाठी चांगले काम केले होते. त्याच अनुषंगाने शिवसेना नेते एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आता पक्ष संघटनेचे काम आम्ही मजबूत करणार असून महायुती अधिक बळकट करणार आहोत- सुमित किशोर पाटील (नगरसेवक तथा गटनेते पाचोरा नगरपालिका)


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button