तुम्ही आमदार,खासदार मुख्यमंत्री फडणवीस यांना बोलवा मी काम माझ्या सोयीने करेल असे उद्धटपणे बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांची तक्रार! पाचोरा पंचायत समितीत जन्म मृत्यूच्या नोंदणी विभागातील आरोग्य सेवकाचा उर्मटपणा

शासन आपल्या दारी साठी प्रशासन प्रत्येक गावात….. मात्र पंचायत समितीच्या योगेश चिकणे यांचा मात्र नागरिकांशी उद्धटपणा….वाचा सविस्तर बातमी…
पाचोरा : शासनाचे नियम धाब्यावर बसवून सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या पाचोरा पंचायत समितीच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील कर्मचाऱ्याचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे. लासगाव येथील एका नागरिकासोबत गैरवर्तणूक करताना, “तुम्ही मुख्यमंत्र्यांना आणा किंवा आमदार-खासदारांना बोलवा, मी माझ्याच पद्धतीने काम करणार,” अशी दर्पोक्ती आरोग्य सेवक योगेश चिकणे यांनी केली आहे. एकीकडे सरकार डिजिटल इंडियाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहे शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांचे काम करण्यासाठी चांगल्या आणि संवेदनशील अधिकारी यांच्या माध्यमातून खूप चांगले काम होत असताना योगेश चिकणे नामक आरोग्य सेवक अशा पद्धतीने वागतो याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी होत असून, हे प्रकरण आता थेट मुख्यमंत्री सचिवालयापर्यंत पोहोचणार आहे.
नेमका प्रकार काय?
ग्रामीण भागातील अनेक नागरिकांच्या जन्म-मृत्यूच्या नोंदी ग्रामपंचायत स्तरावर नसल्याने त्यांना पाचोरा पंचायत समितीच्या चकरा माराव्या लागतात. लासगाव-सामनेर येथील देशमुख नामक व्यक्ती अशाच एका कामासाठी गेले असता, आरोग्य सेवक चिकणे यांनी त्यांच्याशी अत्यंत उद्धटपणे वर्तन केले. विशेष म्हणजे, आमदार किशोर पाटील यांचे खंबीर समर्थक अवी पाटील यांच्यासमोरच हा प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच माध्यम प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचले. पत्रकारांनी “आपण शासनाचे पगार घेता, आपण सेवक आहात नागरिकांचे समाधान करणे हे आपले कर्तव्य आहे,” अशी समज दिली असता चिकणे यांनी थेट मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधींचा अवमान करणारी विधाने केली. मात्र, याठिकाणी नंतर सर्वांसमोर घूमजाव करत “मी असे बोललोच नाही” असे म्हणत टोलवाटोलवी सुरू केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ पाटील आणि भाजपचे माजी सभापती बन्सीलाल पाटील यांनीही संबंधित कर्मचाऱ्याला समज देण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
या वादादरम्यान आरोग्य सेवक चिकणे यांनी जाब विचारणाऱ्या भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्राचे संपादक राहुल महाजन यांच्याशीही उर्मटपणे भाष्य केले असून एका जबाबदार पत्रकाराशी अशा पद्धतीने वागणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध आता वरिष्ठ अधिकारी तसेच पोलिसात तक्रार दाखल महाजन यांनी केली आहे.
एजंटगिरी आणि भ्रष्टाचाराचा वास?
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जन्म-मृत्यू नोंदणी विभागात काही ‘पंटर’ आणि एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. आर्थिक देवाणघेवाण करूनच कामे केली जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. या पैशांची वाटणी एका चहाच्या टपरीवर होत असल्याचेही बोलले जात आहे. या प्रकारामुळे प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रतिमा मलीन होत आहे. या संदर्भात गटविकास अधिकारी (BDO) राठोड यांच्याशी कार्यालयात चर्चा करत असताना, संबंधित कर्मचाऱ्याबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे अशा वारंवार तक्रारी येणाऱ्या कर्मचाऱ्यावर वरिष्ठ प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“शासकीय खुर्चीवर बसून मुख्यमंत्र्यांचा आणि लोकप्रतिनिधींचा अपमान करणाऱ्या अशा उर्मट कर्मचाऱ्याची तक्रार मी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडे केली आहे.
— राहुल महाजन, संपादक
आवाहन: पंचायत समितीमध्ये कामासाठी येणाऱ्या नागरिकांनी कोणत्याही एजंटाला पैसे देऊ नयेत. जर कोणी पैशांची मागणी करत असेल, तर थेट अँटी करप्शन ब्युरो (ACB), जळगाव यांच्याकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.





