चैतन्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘जागर स्त्री शक्तीचा’ उत्साहात; कर्तृत्ववान महिलांचा गौरव

पाचोरा: महिला दिन विशेष आणि ‘जागर स्त्री शक्तीचा’ या संकल्पनेतून चैतन्य बहुउद्देशीय संस्थेमार्फत महिला सक्षमीकरणाचा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात समाजासाठी आदर्श ठरणाऱ्या आणि ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आले. यामध्ये कमलबाई नारायण हिरे यांनी मुलाला स्वतःची किडनी देऊन त्याला पुनर्जन्म देणाऱ्या आदर्श मातेचा गौरव करण्यात आला. उषाबाई गुलाब भिल्ल व गंगाबाई बाबुलाल कुमावत तसेच गावखेड्यात आणि तांड्यांवर जाऊन गोरगरीब महिलांची प्रसूती करून माणुसकीची सेवा देणाऱ्या या दोन्ही महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांची विशेष उपस्थिती होती. तसेच निमजाई फाउंडेशनच्या अध्यक्षा शीतलताई पाटील यांनी महिलांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी व्यासपीठावर आकाश एकनाथ चित्ते (अध्यक्ष, चैतन्य बहुउद्देशीय संस्था) तसेच निकिता आकाश चित्ते (उपाध्यक्ष, चैतन्य बहुउद्देशीय संस्था) त्याच बरोबर लीनाताई रामदादा पवार, (जिल्हाअध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड),कविता महाजन (सरपंच, कुऱ्हाड),कमलबाई अशोक बोरसे (ग्रामपंचायत सदस्य),ऐश्वर्या पाटील (पोलीस पाटील, शिंदाड),लताबाई संतोष चौधरी (माजी ग्रामपंचायत सदस्य),सुवर्णा पाटील (सरपंच, सांगवी) याठिकाणी उपस्थित होत्या. समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या आणि कौटुंबिक त्यागाची पराकाष्ठा करणाऱ्या महिलांना व्यासपीठ मिळवून देत संस्थेने खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा केला.





