पाचोरा एसटी आगारात प्रवाशांच्या समस्यांबाबत ग्राहक पंचायतीचे आगार प्रमुखांना निवेदन

पाचोरा (मधुर खान्देश): अखिल भारतीय ग्राहक पंचायत, महाराष्ट्र प्रांताचे सचिव डॉ. अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा एसटी डेपोमधील विविध समस्या आणि प्रवाशांच्या सोयी-सुविधांबाबत आगार प्रमुख प्रकाश पाटील यांना ९ मार्च रोजी निवेदन देण्यात आले. प्रवाशांच्या हितासाठी स्थानिक पातळीवर तातडीने सुधारणा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनाद्वारे ग्राहक पंचायतीने डेपो प्रशासनासमोर विविध मागण्या केले आहेत यामध्ये आगार परिसरातील बंद असलेली पाणपोई त्वरित सुरू करणे, प्रवाशांसाठी पुरेशी वीज व्यवस्था आणि पंख्यांची सोय करणे. महिला प्रवाशांचे दागिने चोरी होणे आणि पॉकेटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी डेपो परिसरात CCTV कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांसाठी बस सवलतींचा लाभ वेळेवर मिळावा. अमृत योजनेतील (७५ वर्षांवरील) ज्येष्ठांना मोफत प्रवासाचे पासेस विनाविलंब उपलब्ध करून द्यावेत. शासनाने नवीन नियमानुसार लागू केलेले NCMC कार्ड निश्चित केलेल्या दरातच मिळावे. अधिकृत केंद्रांवर या कार्डासाठी जादा रक्कम आकारली जाऊ नये याची दक्षता घ्यावी. बस स्थानक परिसरात स्वच्छता राखणे, पार्किंग सुविधेचा विस्तार करणे आणि लांब पल्ल्याच्या बस फेऱ्या वाढवणे.
यावेळी बोलताना ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने आगार प्रमुखांनी स्थानिक स्तरावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावेत. तसेच जिल्हा स्तरावरील मागण्यांचा पाठपुरावा करून त्या मार्गी लावण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या.
याप्रसंगी परिवहन समितीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण (आबा) सूर्यवंशी, तालुका परिवहन समिती अध्यक्ष सुरेश तांबे, आणि अ.भा. ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष संजय पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.





