पाचोरा नगरपरिषद व कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे ‘स्वच्छता सखी सन्मान सोहळा’ संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी): शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी पाचोरा नगरपरिषद आणि कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता सखी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गुरुवारी, १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता व्यापारी भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद नगराध्यक्षा सौ. सुनीता किशोर पाटील यांनी भूषवले. याप्रसंगी पाचोरा नगरपरिषदेतील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशनचे कार्यक्रम अधिकारी मुकेश चव्हाण आणि नाशिक विभागाचे कार्यकारी अधिकारी देवेंद्र केळोदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांचे सक्षमीकरण आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य या विषयांवर सखोल माहिती देऊन महिलांना आरोग्याप्रति जागरूक राहण्याचे आवाहन केले.
शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यात महिला स्वच्छता दूतांचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन करत नगराध्यक्षा सौ. सुनीता पाटील यांच्या हस्ते सर्व महिला कर्मचाऱ्यांना भेटवस्तू म्हणून साड्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले.या कार्यक्रमास व्यासपीठावर उपनगराध्यक्ष किशोर बारावकर,आरोग्य सभापती सतीश चेडे आरोग्य निरीक्षक तुषार नकवाल, विरेंद्र घारू, शहर समन्वयक निखिल पाटील आणि न.पा. लिपिक आकाश खैरनार. तसेच महिला व बालकल्याण सभापती सौ. मिनाक्षी एरंडे, नगरसेविका सुरेखा पाटील, जयश्री पाटील, वर्षा ब्राम्हणे, मनिषा बाविस्कर, प्रांजल सावंत, खनसा बागवान, कविता हटकर आणि नगरसेवक संजय चौधरी, संदीप राजे पाटील, योगेश पाटील, गोपालदास वासवाणी, राहुल गायकवाड यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पाचोरा नगरपरिषद आणि कुशाग्र फाउंडेशनच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा उचित गौरव केल्याबद्दल शहरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे.





