नवी दिल्लीत पाचोरा नगरपरिषदेचा डंका; ‘अमृत मित्र महोत्सवात’ ८० महिला बचत गटांचा सहभाग

पाचोरा :केंद्र सरकारच्या अमृत योजने अंतर्गत ‘वूमन फॉर ट्रीज’ उपक्रमात सहभागी झालेल्या महिला बचत गटांचा गौरव करण्यासाठी नवी दिल्ली येथील ऐतिहासिक भारत मंडपम येथे १३ मार्च रोजी अमृत मित्र महोत्सव उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात देशभरातील ३० राज्यांमधून प्रतिनिधी आले असताना, पाचोरा नगरपरिषदेचे सर्वाधिक ८० महिला बचत गट प्रतिनिधी उपस्थित राहिल्याने संपूर्ण देशाचे लक्ष पाचोरा शहराकडे वेधले गेले.
- केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद केंद्रीय शहरी विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी भूषविले. यावेळी शहरी विकास खात्याचे सचिव, सहसचिव व वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमृत योजनेच्या माध्यमातून महिलांनी पर्यावरण संवर्धनात दिलेले योगदान अधोरेखित करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता.
- मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी मांडले पाचोरा मॉडेल
या विशेष कार्यक्रमात आयोजित चर्चासत्रात पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना आपले विचार मांडण्याची संधी देण्यात आली. यावेळी त्यांनी पाचोरा शहरात महिला बचत गटांच्या माध्यमातून राबविलेल्या वृक्षारोपण मोहिमेची सविस्तर माहिती दिली.
“पाचोरा शहरात ‘ओपन स्पेस’ सुव्यवस्थित असल्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करणे शक्य झाले. आगामी काळात महिला बचत गटांना नगरपालिका क्षेत्रात अधिक कामे उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना दर्जेदार व्यावसायिक प्रशिक्षणाची गरज आहे,” असे मत देवरे यांनी यावेळी व्यक्त केले.
या ऐतिहासिक क्षणी महिला बचत गटांसोबतच जिल्हा सह आयुक्त जनार्दन पवार, मुख्याधिकारी मंगेश देवरे, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, कर अधीक्षक दगडू मराठे, शहर अभियान व्यवस्थापक अर्जुन भोळे, पाणीपुरवठा अभियंता श्रुतिका धात्रक, भंडारपाल प्रगती खडसे आणि समूह संघटक कुणाल तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बचत गटांच्या उत्साहात भर
देशाच्या राजधानीत मिळालेल्या या बहुमानामुळे पाचोरा शहरातील महिला बचत गटांचा आत्मविश्वास दुणावला आहे. या महोत्सवातील सहभागामुळे आगामी काळात शहराच्या विकासकामात व पर्यावरण संवर्धनात महिला अधिक सक्षमपणे आणि उत्साहाने सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






