भडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी बेपत्ता; प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ

भडगाव तालुक्यातील अंजनविहीरे येथील रहिवासी आणि वरेखेड तसेच पिंपळगाव बु. ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी श्री. जिवराम हिलाल पाटील हे रविवार, २९ मार्च रोजी सकाळपासून अचानक बेपत्ता झाले आहेत. त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने भडगाव तालुक्यासह परिसरात चिंतेचे वातावरण पसरले असून प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्री. पाटील हे २९ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पाचोरा येथून कोणालाही काहीही न सांगता कोठेतरी निघून गेले. दुपारनंतर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद येत होता. रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची सर्वत्र शोधमोहीम राबवली, मात्र अद्याप त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. एकाच वेळी दोन ग्रामपंचायतींचा कार्यभार सांभाळणारे कर्तव्यदक्ष अधिकारी बेपत्ता झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यांचे सहकारी ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि नातेवाईक सध्या त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, अद्याप कोणालाही त्यांच्याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही.
जर कोणाला श्री. जिवराम हिलाल पाटील यांच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास किंवा ते कुठे दिसून आल्यास खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांकडून आणि मित्रपरिवाराकडून करण्यात आले आहे.
संपर्कासाठी क्रमांक: > 📞 8390777232 > 📞 7666619656
ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी या शोधकार्यात मदत करावी, अशी विनंती करण्यात येत आहे.



