मतिमंद मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीस पाचोरा न्यायालयात ‘कोर्ट उठेपावेतो’ शिक्षा व २५ हजार दंड

पाचोरा (प्रतिनिधी):
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील एका मतिमंद मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पाचोरा न्यायालयाने ३१ मार्च २०२६ रोजी दोषी ठरवत महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायाधीश श्रीमती जी. एस. बोरा यांनी आरोपीला कोर्ट उठेपावेतो (निकाल लागल्यापासून कोर्ट सुरू असे पर्यंत) कारावास, १००० रुपये दंड आणि पिडीतेला २५,००० रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा सुनावली आहे. सन २०२३ मध्ये पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात फिर्यादी सुभाष तुकाराम सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून आरोपी बिस्मिल्ला इमाम मुसलमान याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३५४(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता (गु.र.नं. २०४/२०२३). आरोपीने एका मतिमंद मुलीची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणात Rcc no-178/2025 नुसार सुनावणी पार पडली. खटल्यादरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी आणि पीडिता यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. पुराव्यांच्या आधारे, न्यायालयाने आरोपी बिस्मिल्ला इमाम मुसलमान याला CRPC कलम २४८(२) नुसार दोषी ठरवले.
न्यायालयाने दिलेली शिक्षा:
- शिक्षा: कोर्ट उठेपावेतो कारावास.
- दंड: १,००० रुपये.
- नुकसान भरपाई: पीडितेच्या पुनर्वसनासाठी व नुकसान भरपाई म्हणून २५,००० रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या केसमध्ये सरकारी अभियोक्ता श्री. पी. बी. भावसार यांनी प्रभावीपणे सरकारची बाजू मांडली. सदर तपास उपनिरीक्षक (PSI) अमोल पवार यांनी केला होता.
पाचोरा विभागाचे SDPO मा. बापू रोहम साहेब आणि पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सपोनि मा. कल्याणी वर्मा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी राजेंद्र पाटील (ब.नं. १२३४) आणि केस वॉच पो.ना. दीपक पाटील (ब.नं. १२८१) यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. न्यायाच्या या निर्णयामुळे परिसरात पोलिसांच्या आणि न्यायव्यवस्थेच्या कामाचे कौतुक होत आहे.





