कजगाव जवळ कार-दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकी जळून खाक, तरुण गंभीर जखमी

दि.३० मार्च २०२६ रोजी मिळालेल्या माहितीनुसार कजगाव-भडगाव मार्गावरील कजगाव शिवारात कार आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत एक धनगर समाजातील मेंढपाळ करणारा तरुण दुचाकीने घरी जात असताना गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात धडक इतकी भीषण होती की, मोटरसायकलने तत्काळ पेट घेतला आणि ती पूर्णतः जळून खाक झाली. कारमधील एअरबॅग वेळेवर उघडल्याने त्यातील प्रवासी सुदैवाने बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील चार जण आपल्या कारने (क्र. एमएच ०१ सीएच ४२६०) लग्नसमारंभासाठी कासोदाकडे जात होते. दरम्यान, पाचोरा येथून साकुरी (ता. मालेगाव) कडे मोटरसायकलने जाणाऱ्या तरुणाच्या वाहनाची आणि कारची कजगाव शिवारात जोरदार धडक झाली. धडक होताच मोटरसायकलला आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे परिसरात आणि महामार्गावर धुराचे लोट पसरले होते, ज्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती.
एअरबॅगमुळे कारमधील प्रवासी सुरक्षित
या भीषण अपघातात कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, कारमधील एअरबॅग वेळेवर उघडल्या गेल्याने मोठा अनर्थ टळला आणि कारमधील प्रवासी सुरक्षित राहिले. दुसरीकडे, मोटरसायकलस्वार तरुण या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच कजगाव पोलीस मदत केंद्राचे हेड कॉन्स्टेबल किशोर सोनवणे, पोलीस पाटील राहुल पाटील आणि भोरटेक येथील भाऊसाहेब जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरुणाला रुग्णवाहिकेच्या साहाय्याने उपचारासाठी चाळीसगाव येथे हलवण्यात आले आहे.
रस्त्यावरील जळालेली मोटरसायकल बाजूला सारून आणि गर्दी पांगवून पोलिसांनी काही वेळातच वाहतूक सुरळीत केली. या भीषण अपघातामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.





