पाचोऱ्यात जितेंद्र जैन व प्रवीण ब्राह्मणे यांच्या वाढदिवसानिमित्त जी.प. उर्दू कन्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप; शाळेची पटसंख्या १०% ने वाढली

पाचोरा, दि. २९ जुलै २०२५: युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन आणि भीमशक्ती शिवशक्ती जिल्हाप्रमुख प्रवीण ब्राह्मणे यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा येथील जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सईद शेख, मुजाहिद खान, अलीम शाह आणि सलीम शाह यांनी या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाला जितेंद्र जैन, प्रवीण ब्राह्मणे, डॉ. भरत पाटील आणि कोराडखेडा उर्दू केंद्रप्रमुख शेख कदिर उपस्थित होते. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
शाळेची पटसंख्या ४२५ वर; १०% वाढ
जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळेने “अबकी बार ४०० पार” हा संकल्प कृतीतून साकार केला आहे. मागील वर्षी शाळेची पटसंख्या ३८६ होती, तर यंदा ती ४२५ वर पोहोचली आहे, म्हणजेच १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आनंददायी वातावरण, खेळातून शिक्षण, शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षांद्वारे स्पर्धात्मक दृष्टिकोन निर्माण केल्याने हा बदल घडला आहे. शाळेत विविध उपक्रम आणि प्रभावी कृतींची अंमलबजावणी केली जात असल्याची माहिती उपशिक्षक शेख जावेद रहीम यांनी दिली.
विज्ञान सप्ताहात विद्यार्थ्यांचा सहभाग
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या २६ जुलैच्या पुण्यतिथीनिमित्त शाळेत विज्ञान सप्ताह साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी कोळशाचे पाथर, ज्वालामुखी यांसारखी मॉडेल्स आणि चार्टद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन दाखवला. प्रवीण ब्राह्मणे यांनी शाळेतील शैक्षणिक वातावरण, शिस्त आणि शिक्षकांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. तसेच, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमात मुख्याध्यापक एजाज रऊफ, सईद शब्बीर, निसार पिंजारी, खिजरोड्डीन सातभाई, तौसिफ शेख, सलीम शाह, मुजाहिद सय्यद, अलीम शेख, उपशिक्षिका सुमय्या देशमुख, शबाना देशमुख, अंजुम देशमुख, सलाउद्दीन शेख, नासिर शेख, इम्रान शेख आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शेख जावेद रहीम यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.