आषाढी एकादशीनिमित्त नवी मुंबईत विविध दिंडीद्वारे समाजप्रबोधन

नवी मुंबई, दि. 08 जुलै 2025: नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय (शाळा क्र. 113, महापे) येथे आषाढी एकादशीनिमित्त शिक्षण उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध दिंडींचे आयोजन करण्यात आले. यामध्ये साक्षरतेची दिंडी, स्वच्छतेची दिंडी, वारकरी दिंडी आणि वृक्षारोपणाची दिंडी यांचा समावेश होता.
सकाळी शाळेतून प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी सुविचारांचे बॅनर आणि विठ्ठल-रुक्माई तसेच ओला-सुका कचरा यांच्या पालख्या हातात धरल्या. लेझीम पथकाच्या गाजावाजासह महापे गावातून ही फेरी काढण्यात आली. या दिंडीद्वारे साक्षरता, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि वारकरी परंपरेच्या घोषणांद्वारे समाजप्रबोधन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेचे मुख्याध्यापक दिपक नामदेव बडगुजर यांनी केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दिंडीच्या यशस्वीतेसाठी शिक्षक सारिका पाटील, महादेव तोंडे, संध्या झाकणे आणि शिक्षकेतर कर्मचारी विकी मोरे, मंदा पिंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
हा उपक्रम समाजात सकारात्मक संदेश पसरवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला.