जळगांव जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोहीम: दोन महिन्यात ६४ लाखांचा मुद्देमाल जप्त!

मधुर खान्देश वृत्तसेवा, जळगांव: जळगांव जिल्ह्यात 3 आणि 4 जून 2025 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकरखेडे (ता. यावल), गिरड (ता. पाचोरा), बांबरुड आणि टोणगाव (ता. भडगाव) येथे संयुक्त मोहीम राबवली. अधीक्षक व्ही. टी. भुकन यांच्या आदेशानुसार चाळीसगाव आणि जळगांवच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. यात 6 गुन्हे नोंदवून 6 आरोपींना अटक करण्यात आली. 4980 लिटर रसायन नष्ट, 240 लिटर गावठी हातभट्टी दारू आणि 2 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. एकूण 3,34,550/- रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला. ही कारवाई निरीक्षक अशोक तारू, किशोर गायकवाड, दुय्यम निरीक्षक योगेश सूर्यवंशी, मुकेश पाटील, भाऊसाहेब पाटील, रघुनाथ सोनवणे, नंदकिशोर पवार, विठ्ठल हटकर, गिरीश पाटील, राहुल सोनवणे आणि पूनम पाटील यांच्या पथकाने केली. या मोहिमेमुळे गावठी दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून एप्रिल व मे 2025 मध्ये जळगांव विभागाने 362 गुन्हे नोंदवले, 366 आरोपींना अटक केली आणि 64,11,200/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


