पाचोऱ्यात वादळी पावसाने झाडांची पडझड, तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसान विजेच्या अनेक तारा तुटल्या; अद्यापही विज पुरवठा खंडित

पाचोरा, दि. ११ जून २०२५: बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने पाचोरा शहरात हजेरी लावली. यामुळे शहरातील काही ठिकाणी झाडे कोसळली, ज्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. विशेषतः पाचोरा शहरातील रेल्वे भुयारी मार्गात एक मोठे झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. मंगेश देवरे आणि पाचोरा तहसीलदार श्री. विजय बनसोडे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू केले. यावेळी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलली.
वादळी पावसामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी प्रशासन आणि कर्मचारी युद्धपातळीवर कार्यरत असून, लवकरच परिस्थिती पूर्ववत होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.