पाचोऱ्यातील पत्रकारांचा पुढाकार! अधिकाऱ्यांचे डोळे पाणावले,मागील आठवड्यात झालेल्या चक्रीवादळ सदृश्य परिस्थितीत प्रशासनाचे कौतुकास्पद कार्य; पत्रकारांकडून महसूल, वीज व पालिकेचा भावनिक सन्मान

मधुर खान्देश वृत्तसेवा: पाचोरा, दि. १८ जून २०२५: पाचोरा तालुका आणि शहरात काही दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले. वीज खांब कोसळणे, झाडे रस्त्यांवर पडणे, घरात पाणी शिरणे आणि शेतीपिकांचे नुकसान अशा संकटात महसूल विभाग, महावितरण आणि नगरपालिका प्रशासनाने जीवाची पर्वा न करता अथक कामगिरी बजावली. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पाचोऱ्यातील पत्रकार बांधवांनी या तिन्ही यंत्रणांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भावनिक सत्कार केला.
महसूल विभागाच्या प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने गावोगावी धाव घेत पंचनामे, नुकसान पाहणी आणि शासकीय मदतीचे अहवाल तातडीने तयार केले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ३६ तास झोप न घेता, धोकादायक परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत केला. पालिकेच्या सफाई, जलपुरवठा, बांधकाम आणि आरोग्य विभागाने रस्त्यावरील पाणी, झाडांच्या फांद्या हटवणे, कीटकनाशक फवारणी आणि नागरिकांना तात्काळ मदत यांसारखी कामे झपाट्याने पार पाडली.
या तिन्ही यंत्रणांच्या समन्वयाने नागरिकांचा त्रास लवकर कमी झाला. पत्रकारांनी प्रशासनाच्या या समाजसेवेची नोंद घेत, वर्ग १ ते ४ पर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा कार्यालयात जाऊन सन्मान केला. “संकटात देवासारखी माणसं भेटतात,” अति प्रतिक्रिया पाचोरातील पत्रकार बांधवांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.
या सन्मानामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील नाते अधिक दृढ झाले असून “चांगले कार्य लोकांसमोर आणणे हे देखील पत्रकारितेचे कर्तव्य आहे,” असे पत्रकारांनी सिद्ध केले.
पत्रकार बांधवांच्या माध्यमातून प्रशासनाचा सत्कार म्हणजे समाजाला सकारात्मक संदेश देणारा ठरणार असून ज्यामुळे प्रशासन, नागरिक आणि पत्रकार यांच्यातील सहकार्याचा सेतू अधिक मजबूत झाला असल्याची प्रतिक्रिया पाचोरा विभागाचे प्रांत अधिकारी भूषण अहिरे यांनी व्यक्त केली आहे.
- तहसीलदार विजय बनसोडे यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत म्हटले की, पत्रकार बांधवांनी आमची दखल घेऊन सन्मान केला म्हणजेच आमच्या कामाची पावती मिळाली असे यातून स्पष्ट होते. तुमच्या सन्मानाने आम्ही भारावून गेलो आहोत प्रशासनाला पत्रकार बांधवांचे सहकार्य असल्यास नक्कीच जलद गतीने कार्य करता येते.
- आमच्या टीमने तब्बल आठवडाभर सतत काम केले आहे महावितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी देखील आम्ही कुठेही न डगमगता आमचे कार्य रात्रंदिवस सुरू ठेवले आणि पाचोरा शहर तसेच तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत केला यासाठी आम्हाला पत्रकार तसेच अनेक आमच्या ग्राहकांचे सहकार्य लाभले त्यांचे आम्ही आभार मानतो आणि पत्रकार बांधवांनी आमचा सन्मान केला त्याबद्दल देखील आम्ही त्यांच्या ऋणी आहोत. तुम्ही आमच्या कामाची दखल घेतली म्हणजे संपूर्ण समाजाने दखल घेतली हे यातून स्पष्ट होते:प्रमोद हेलोडे (कार्यकारी अभियंता,महावितरण पाचोरा)
- पाचोरा शहरामध्ये विशेषता भुयारी मार्ग त्या ठिकाणी रहदारीला मोठा अडथळा झाला होता तसेच पाचोरा शहरांमध्ये प्रवेश करणारी अनेक रस्त्यांवर झाडे पडली होती या सर्व संकटामध्ये हिमतीने मी माझ्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत काम केले आणि जनजीवन सुरळीत करण्यासाठी काम केले यामध्ये पत्रकार बांधवांचा त्याच बरोबर प्रशासनाचे मार्गदर्शन व सहकार्य आम्हाला लाभले तुमच्या सहकार्यामुळेच आम्ही काही गोष्टी लवकर करू शकलो त्याबद्दल पत्रकार बांधवांचे नक्कीच विशेष आभार मानतो:मंगेश देवरे, पाचोरा नगरपरिषद