पाचोऱ्यातील उदयनराजे भोसले समर्थक ग्रुपचा जळगाव येथे सत्कार; रक्तदान शिबिराचे जिल्ह्यात कौतुक

जळगाव, दि. २२ जून २०२५: इंडियन रेड क्रॉस सोसायटी, जळगाव यांच्या वतीने पाचोरा येथील श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले समर्थक ग्रुपच्या सामाजिक कार्याची दखल घेत जळगाव जिल्हा नियोजन समिती सभागृहात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ग्रुपचे सदस्य सचिन संतोष पाटील आणि श्याम भिकन पाटील यांचा भुसावळ रेल्वे विभागाच्या डीआरएम श्रीमती इती पांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पाचोरा येथील उदयनराजे भोसले समर्थक ग्रुप दरवर्षी शिव जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन करतो. या शिबिरातून जमा झालेला रक्तसाठा गरजू रुग्णांसाठी उपयोगी ठरतो. या सामाजिक उपक्रमाला पाचोरा येथील सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठबळ देतात. “रक्तदान म्हणजेच श्रेष्ठ दान” या उक्तीला साजेसा हा उपक्रम समाजात रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासह गरजूंना जीवनदान देण्याचे कार्य करतो.
सत्कार समारंभात डीआरएम श्रीमती इती पांडे यांनी ग्रुपच्या या कार्याचे कौतुक करत सामाजिक बांधिलकीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनीही ग्रुपच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. उदयनराजे भोसले समर्थक ग्रुपने भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांना गती देण्याचा संकल्प व्यक्त केला.






