जळगाव जिल्ह्यातील वकील संघांच्या ग्रंथालयांना आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून कायद्याच्या पुस्तकांसाठी ५० हजारांचा निधी

जळगाव,(भडगाव) दि. २२ जून २०२५: जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रमुख वकील संघांच्या ग्रंथालयांना कायद्याची पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी आमदार निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची मागणी मान्य केली आहे. नुकत्याच झालेल्या जळगाव जिल्हा दौऱ्यादरम्यान त्यांनी याबाबत आश्वासन दिले. ही पुस्तके नोव्हेंबर २०२५ पर्यंत जिल्ह्यातील सर्व वकील संघांच्या ग्रंथालयांना पुरवली जाणार आहेत.
या मागणीसाठी ॲड. अंबादास गोसावी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. यासंदर्भात भडगाव येथे वकील संघाच्या शिष्टमंडळाने आमदार तांबे यांची भेट घेतली. यावेळी भडगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड. बी. आर. पाटील, सचिव ॲड. भरत ठाकरे आणि ॲड. निलेश तिवारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व वकील संघांच्या अध्यक्ष आणि सचिवांना ॲड. गोसावी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यापूर्वी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही वकील संघांच्या वाचनालयांसाठी पुस्तके आणि संगणक उपलब्ध करून दिले होते. ही परंपरा आमदार सत्यजित तांबे पुढे नेत असून, उत्तर महाराष्ट्रातील वकील समाज एकसंघपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे.
आमदार तांबे घेत आहेत कायद्याचे धडे
उच्चशिक्षित, अभ्यासू आणि विनम्र व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे आमदार सत्यजित तांबे सध्या मुंबई विद्यापीठाच्या शासकीय महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या या अभ्यासू वृत्तीमुळे वकील समाजात त्यांच्याबद्दल विशेष आदर व्यक्त होत आहे.
संपर्क: ॲड. अंबादास गोसावी, जळगाव वकील संघ
स्थळ: भडगाव, जळगाव